Friday, April 26, 2024
Homeनगरशिर्डीतील अपहृत चिमुरडी काटवनात सापडली

शिर्डीतील अपहृत चिमुरडी काटवनात सापडली

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- शिर्डी शहरातील प्रसादालयासमोरील पार्कींगमधून अज्ञात व्यक्तीने पाच महिन्याची चिमुरडी चोरून नेल्याची घटना घडली होती. मात्र सदरची मुलगी चोवीस तासांच्या आत निमगाव ग्रामस्थांच्या मदतीने सप्ताह मैदान जवळील शिंदे मळ्यातील काटवनात बेवारसरित्या मिळाल्याने शिर्डी पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आरोपी मात्र फरार आहे. पोलीस सि.सि.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीच्या मागावर असल्याचे शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी सांगितले.

दि. 18 रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शिर्डी येथील प्रसादालयासमोरील पार्किंगमधून मध्यप्रदेश येथील सीमा रावत या महिलेची पाच महिन्यांची मुलगी झोळीतुन उचलून एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घातली होती. याबाबत शिर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी तपासाची वेगाने चक्रे फिरवत पोलिस पथके रवाना केली होती.

- Advertisement -

मात्र या घटनेला 24 तास पुर्ण होत नाही तोच निमगाव हद्दीतील सप्ताह मैदानाशेजारील शिंदे मळा येथे अंजनाबाई निकम या 65 वर्षीय वृद्ध महिला खुरपणी करत असताना बाजूला काटवनात रडण्याचा आवाज आला. यावेळी त्यांनी काटवनात डोकून बघितले तर बेवारस बाळ रडताना आढळून आले. या घटनेची खबर निमगाव ग्रामपंचायतीचे सरपंच शिल्पाताई कातोरे तसेच कैलास कातोरे यांना फोनवर सांगितल्यानंतर कैलास कातोरे व मंगेश कातोरे यांनी मित्रपरिवारासह घटनास्थळी धाव घेतली.

त्याठिकाणी चोरून नेलेली पाच महिन्याची चिमुरडी मिळून आल्याने कातोरे यांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक दीपक गंधाले तसेच सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना संपर्क करून सांगितल्यानंतर शिर्डी पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरून नेलेली पाच महिन्याची चिमुरडी दुर्गा असल्याची खातरजमा पोलिसांनी केल्यानंतर सदर बाळाला महिला पोलिसांच्या मदतीने उचलून साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल केले.

यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस उपनिरीक्षक बारकु जाणे, पो.हे.काँ. बाळासाहेब मुळीक, पो. ना. शंकर चौधरी, पो. ना. विशाल दळवी, पो. काँ. संदीप दरंदले, शिर्डी पोलीस ठाण्याचे पो. ना. सुभाष थोरात, पो. ना. सोनवणे, पो. ना. मकासरे, पो. ना. पंढोरे, पो. ना. प्रविण अंधारे, पो. ना. वर्पे, पो. काँ. शेख, महिला पो.काँ. रुपाली राजगिरे, पो. कॉ. औताडे यांचे सहकार्य लाभले. डॉक्टरांनी बाळाची प्रकृतीची तपासणी केली असता ठीक असल्याचे सांगत बाळाला आई सिमा रावत यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी महिलेला अश्रू अनावर झाले नाही. तिने आपल्या भावना व्यक्त करत शिर्डी पोलीसांचे आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या