शिर्डीत ईदनिमित्तच्या बैठकीत पोलिसांकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

jalgaon-digital
3 Min Read

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून रुग्णांची संख्याही वाढली आहे. नगर जिल्हा नॉन रेड झोन घोषित केला म्हणून करोनाचा नायनाट झाला असे नाही. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंंगचे नियम डावलणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिर्डी पोलिसांनी मुस्लिम बांधवांंच्या पवित्र रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस ठाण्यात राहाता तसेच कोपरगांव येथील मौलाना व मस्जिदचे ट्रस्टी यांची बैठक बोलावण्यात आली होती. यादरम्यान बैठकिसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने शिर्डी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करुन बसावे लागल्याने सोशल डिस्टस्निगंचा फज्जा उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले.

राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नगर जिल्ह्यात नॉन रेड झोन जरी घोषित करण्यात आले असले तरी करोना व्हायरसचा नायनाट झाला नाही. ही बाब विसरून चालणार नाही. शिर्डी पोलीस प्रशासनाच्यावतीने गुरुवार दि. 21 रोजी स.11 वाजता राहाता व कोपरगाव या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाजाचे मौलाना आणि मस्जिदचे ट्रस्टी यांना येणार्‍या रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन त्याचप्रमाणे सुचना करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समुदायाचे मौलाना व प्रतिनिधी जमा झाले होते.

बैठक 11वाजता ठेवण्यात आली होती मात्र अधिकारी दोन तास उशिरा आल्याने रमजानचे उपवास धरलेल्या सर्व मौलानांना व ट्रस्टींना पोलीस अतिथी गृहाबाहेरील जागेत भर उन्हात वाट पाहत बसावे लागले. यावेळी पोलीस अतिथीगृहात बसण्यासाठी तसेच बैठकिचे नियोजन केले नव्हते. या बैठकीला सुमारे शंभर ते दीडशे मुस्लीम बांधव उपस्थित होते. पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम तोडत लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवल्यासारखे केले. यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात आले नाही. विशेष म्हणजे सर्वसामान्यांना लॉकडाऊनचा नियम दाखवणारे पोलिसांना मात्र आपल्याच आवारातच सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी करून बसल्याचे चित्र स्वतःच्या डोळ्याने पहावे लागले.

याबाबत स्थानिक पत्रकारांना माहिती समजताच पोलीस ठाण्यात उपस्थित होऊन वृत्तांकन करण्यासाठी आत जात असतांना पोलिसांनी अतिथीगृहामध्ये आत सोडण्यास प्रतिकार करत बाहेरच उभे केले. त्यामुळे सदरच्या बैठकीत काय खलबते झाली याबाबत काही समजले नाही. मात्र पोलिसांनी आयोजित केलेल्या बैठकीचे एकाएकी गर्दी झाल्याने त्यांच्याच अंगलट आले. नगर जिल्हा नॉन रेड झोनमध्ये जरी असला तसेच शिर्डीसह राहाता तालुका करोनामुक्त असली तरी करोनाचा प्रादुर्भाव किंवा संसर्ग अशा गर्दीच्या बैठकांमुळे होण्याची दाट शक्यता असल्याने अशाप्रकारे गर्दी टाळणे गरजेचे होते.

लाँकडाऊनचे नियम व कायदा सर्वसमान आहे. त्यामुळे सोशल डिस्टस्निगंचे नियम धाब्यावर बसवून नियम मोडणार्‍यांंवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. राहाता आणि कोपरगाव या दोन्ही तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचे नमाज पठण घरातच करण्यात येईल, असे आश्वासन शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना देण्यात आले असल्याचे मौलाना यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *