Thursday, April 25, 2024
Homeनगरयेवला येथे सेवेतील करोनाग्रस्त डॉक्टर शिर्डीत येऊन गेल्या..

येवला येथे सेवेतील करोनाग्रस्त डॉक्टर शिर्डीत येऊन गेल्या..

शिर्डीतील 10 जण नगर येथे तपासणीसाठी रवाना
शिर्डी (शहर प्रतिनिधी)- लॉकडाऊनच्या अगोदर देश-विदेशातील शेकडो साईभक्त येऊन गेले तरीही आजतागायत साईंच्या कृपेने शिर्डीत एकही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही. मात्र येवला येथे वैद्यकीय सेवा करणार्‍या एक करोनाग्रस्त डॉक्टर शिर्डीत आपल्या परिवाराला भेटून गेल्या असल्याची वार्ता समजताच शिर्डी शहरात उलट सुलट चर्चेला उधाण आले असून नागरिक भयभीत झाले आहेत.
सदर डॉक्टरच्या कुटुंबातील 10 सदस्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. सदरचे कुटुंब राहत असलेल्या परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अधिकार्‍यांनी दिला आहे. शिर्डी शहरातील नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्र. 12 मध्ये रहिवासी असलेल्या मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून आरोग्य सेवा करणार्‍या करोनाग्रस्त डॉक्टर आपल्या परिवाराला भेटायला येऊन गेल्या आहेत.
या घटनेची खबर प्रशासनाला मिळताच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे, शिर्डी पोलीस, नगरपंचायतचे कर्मचारी, वैद्यकीय पथक यांनी त्या परिसरात तातडीने भेट देऊन खबरदारीच्या उपाययोजना केल्या. यावेळी सदरील डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्यांना 108 रुग्णवाहिकेतून नगर येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
करोनाग्रस्त डॉक्टर आपल्या परीवारास भेटायला आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान या भागातील रहिवाशांनी तसेच शिर्डी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता घरात बसून राहणे व आपल्या आरोग्याची काळजी घेणे हाच एकमेव उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने सर्वांची संपूर्ण आरोग्य तपासणी करत असल्याची माहिती वॉर्डातील नगरसेवकांनी दिली आहे.
सामाजिक कार्यकर्ते पोपट शिंदे यांनी या परिसरातील नागरिकांचे आरोग्य तपासणीचे काम होत असल्याचे सांगितले. शिर्डीतील पोलीस यंत्रणा प्रशासन आणि नगरसेवक यांनी नागरिकांना करोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नका, जर कोणी आलेच तर त्याची माहिती तात्काळ द्या, असे आवाहन केले असताना या घटनेमुळे शिर्डी शहरात काहीवेळ चर्चेला उधाण आले मात्र साईबाबांच्या शिर्डीत कोणत्याही प्रकारचा साथरोग येणार नाही, असा आत्मविश्वास शिर्डीकरांनी बोलून दाखवला आहे.
शिर्डी येथील रहिवासी असलेले डॉक्टर करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले असून सदरील डॉक्टर नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात रुग्ण सेवा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे आपल्या घरी आले होते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावले उचलून त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या त्यांंच्या कुटुंबातील एकूण दहा लोकांना तपासणीसाठी अहमदनगर येथील सिव्हिल रुग्णालयात नेले आहे तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले.
– डॉ. गोकुळ घोगरे, वैद्यकीय अधिकारी राहाता ग्रामीण रुग्णालय
कोपरगावकरांची चिंता वाढली
कोपरगाव तालुक्याच्या आजुबाजूच्या तालुक्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच येवला शहरात बुधवारी सकाळपर्यंत 25 बाधीत रुग्ण आढळल्याने कोपरगावकरांची चिंता वाढली आहे. तसेच येवला येथून कोपरगाव येथे दररोज कामासाठी व इतर व्यवहारीक देवाण घेवाण उद्योग व्यवसायानिमित्त दररोज किमान दोन हजार नागरिक ये-जा करीत असतात. त्यामुळे हा संसर्ग पुन्हा कोपरगावात होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या