Wednesday, April 24, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळावरून 45 प्रवासी विमानाचे आज लॅन्डींग

शिर्डी विमानतळावरून 45 प्रवासी विमानाचे आज लॅन्डींग

हैद्राबादहून येणार्‍या विमानात नगर जिल्ह्यातील 18 प्रवाशांचा समावेश

शिर्डी (शहर प्रतिनिधी)– देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अचानक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना शासनाच्यावतीने घरी सोडण्यास उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान दोन ते अडीच महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शिर्डी विमानतळावर आज सायंकाळी पावणेसहा वाजता हैद्राबाद येथून 47 प्रवाशांसह उड्डाण केलेली इंडिगो कंपनीची 75 आसनी फ्लाईट लँडिंग करणार असून यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 18 प्रवाशांचा समावेश असल्याचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान देशात तसेच राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील दोन नंबरचे सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शिर्डीचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे देशात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले होते. या कामगारांना आपल्या घरी पोहचण्यासाठी केंद्र व राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत असून राज्यातील कामगारांना बससेवा, रेल्वेसेवा तसेच विमानसवेच्या माध्यमातून सेवा देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अठरा कामगार हैद्राबाद येथे अडकून पडल्याने त्यांच्यासह एकूण 47 प्रवाशांना हैद्राबाद येथून इंडिगो कंपनीचे 75 आसनी फ्लाईट सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी शिर्डी विमानतळावर लँडिंग करणार असल्याचे प्रांताधिकारी शिंदे यांनी सांगितले. यातील अठरा कामगार हे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील असून त्यांना शिर्डीत क्वारंटाईन करण्यात येणार नाही मात्र त्या त्या तालुक्यातील तहसीलदार यांना याबाबत माहिती दिली आहे.

साईमंदिर बंद असल्याने या लोकांना मंदिर परिसरात फिरकता येणार नाही. शिर्डी विमानतळ सुरू झाल्यापासून प्रथमच एवढ्या दिवस बंद असलेल्या विमानतळावर आज इंडिगो कंपनीचे फ्लाईट येणार असल्याने काकडी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासी वाहतूक करणार्‍या येथील अनेक युवकांना पुन्हा रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या