Thursday, April 25, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळाच्या असुविधांची परवड थांबता थांबेना

शिर्डी विमानतळाच्या असुविधांची परवड थांबता थांबेना

अनेक विमानांचे लँडींग रद्द

राहाता (तालुका प्रतिनिधी)- देशातील व विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या शिर्डी येथील साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडींग आणि टेकअपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणाच अद्याप बसवण्यात आलेली नसल्याने व्हीजीबीलीटीच्या अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे. धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडींग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या असल्याने विमान कंपन्यांप्रमाणे विमान प्रवाशांनी विमानतळ प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

देशाच्या राष्टपतींच्या हस्ते घाईघाईत शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर दुसर्‍याच दिवसापासून म्हणजे 2018 पासून शिर्डी विमानसेवेला सुरुवात केली. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्षे लोटूनही अद्याप नाईटलँडींग सुविधा उपलब्ध करण्यात विमानतळ विकास कंपनीला अपयश आले आहे. प्रवाशांसाठी टर्मीनल इमारत सुध्दा अद्ययावत नाही.

याबाबत शिर्डी विमानतळाचे संचालक दीपक शात्री उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ काढ़ूपणाची भूमिका बजावत असल्याची तक्रार विमान कंपन्या आणी विमान प्रवाशांकडून होत आहे. माध्यामांनी याबाबत विचारणा केली असता दोन वर्षांपासून तीन महिन्यांत नाईट लँडींगचे काम पूर्ण होईल हेच सांगितले जाते. वेळोवेळी घोषणा केल्या जातात मात्र असुविधांची परवड काही थांबत नाही. टर्मीनलच्या इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असे वारंवार सांगीतले गेले . मात्र अद्यापही काम सुरू होत नाही. निधीची काही कमतरता आहे का? यावर शात्री म्हणतात की निधीची कोणतीही अड़चण नाही मग काम कोठे अडले? असा प्रश्न विमानप्रवाशांना पडला आहे.

शिर्डी एअरपोर्टला देशभरातील विमान प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सध्या दिल्ली, बेंगळुरू, हैद्राबाद, चेन्नई, इंदोर आदी ठिकाणांहून शिर्डीत दररोज अठ्ठावीस विमानांचे ऑपरेशन करण्यात येते. मुंबई, पुणे, नागपूर नंतर शिर्डी एअरपोर्ट चौथ्या स्थानावर असताना शिर्डी एअरपोर्टकडे सरकारने दुर्लक्ष करू नये, अशी मागणी विमानप्रवाशांकडून होत आहे. शिर्डी एअरपोर्टचे डायरेक्टर दीपक शात्री यांच्याकडून विमानप्रवाशी व माध्यमांच्या प्रतिनिधींनाही व्यवस्थित माहिती दिली जात नाही.

मागील दोन महिन्यांपूर्वी महिनाभरात व्हीजीबीलीटीच्या कारणाने शिर्डी एअरपोर्टवरील लँडींग जवळपास महिनाभर बंद होते. त्यावेळी नाताळ व दीपावली सुट्टीत शिर्डीत येणार्‍या हजारो विमानप्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. महिनाभरानंतर करोड़ो रुपये खर्च करून व्हीजीबीलीटीचा प्रश्न निकाली काढून पुन्हा विमानसेवा सुरू केली असल्याचा दावा दीपक शात्री यांनी केला होता . मात्र काल सोमवारी पुन्हा व्हीजीबीलीटीचा प्रश्न निर्माण झाल्याने मोठ्या बोईंग विमानांचे लँडींग शिर्डीत होऊ शकले नाही. त्यामुळे दिल्ली आणि चेन्नईच्या विमान प्रवाशांचे मोठे हाल झाले. दिल्ली विमान अचानक रद्द केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

नाशिक येथील विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळावरील नाईट लँडींग व टर्मीनल इमारतीच्या कामाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी घोषणा केली असली तरी विमानतळ विकास कंपनीच्या मनमानी कारभारामुळे देश-विदेशातील साईभक्त विमान प्रवाशांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. सरकारने तातडीने नाईट लँडींगसह सर्व सुविधा शिर्डी विमानतळावर उपलब्ध करून देण्याची मागणी विमान प्रवाशांकडून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या