Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नवीन नेतृत्व तयार न होऊ देण्याची सरकारची मानसिकता

Share
latest news, shetkari sanghatana adhivestion, statement, rahata

राजू शेट्टी : साकुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना अधिवेशन

राहाता (तालुका प्रतिनिधी)- थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करणे चुकीचे असून नविन नेतृत्व तयारच होऊ द्यायचं नाही, ही राज्य सरकारमधील लोकांची मानसिकता आहे. आपलीच पारंपारिक घराणी सत्तेत राहिली पाहिजेत यासाठी हा निर्णय असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली.

साकुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीसह जिल्हास्तरीय नविन कार्यकारिणीची निवड पार पडली यावेळी ते बोलत होते. राजू शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरही घणाघाती टीका केलीय. शेतकर्‍यांच्या नावावर राज्यात सत्तेत आलेले आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका त्यांनी करत घराणेशाहीचे समर्थन करणारे हे सरकार असून तुमचे घराणे अगोदरच आमच्या बोकांडी बसलेत किमान गावातले तर संपवू द्या, अशी घणाघाती टीका थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करण्यावर केली.

पटसंख्येच्या नावाखाली राज्य सरकार शाळा बंद करायला निघाले. राज्यात अनेक ठिकाणी अती दुर्गम भागात शाळा आहेत. वाड्या वस्त्यांवरच्या शाळा बंद झाल्या तर मुलांना पायपीट करावी लागणार असून अनेक मुली शाळा सोडून घरी बसतील. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. गुलामांना जन्म घालणारी ही व्यवस्था आहे का? असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला विचारत शिक्षणाच्या बाबतीत सरकारने नफा तोटा पाहू नये, असा सल्ला दिला.

शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, कर्जमाफीत शेतकर्‍यांची फसवणूक झाली असे असताना हे सरकार नेमके कुणासाठी काम करतेय, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. सीएए, एनआरसीला स्वाभिमानीचा विरोधच असून मूळ मुद्यांना बाजूला ठेवून हा निर्णय घेणे अयोग्य असून केंद्र सरकारची धोरणं शेतकरी विरोधी आहेत. आयात निर्यातीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला असून हे सरकार काय शेतकर्‍यांचे सरकार आहे का ? असा संतप्त सवाल केंद्र सरकारवर उपस्थित केला.

यावेळी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय व जिल्ह्यास्तरीय पदाधिकारी नेमणुका पार पडल्या. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नाशीक येथील संदीप जगताप तर स्वाभिमानी पक्षाच्या प्रदेशीध्यक्षपदी कोल्हापूर येथील डॉ. प्रा. जालिंदर पाटील यांची निवड करण्यात आली. अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी रवींद्र मोरे तर उपाध्यक्षपदी विठ्ठलराव शेळके यांची, नगर दक्षीण जिल्हाध्यक्षपदी सुनील लोंढे यांची निवड झाली.

सर्व नूतन पदाधिकार्‍यांना संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याहस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी रविकांत तुपकर, डॉ. प्रकाश पोपळे, प्रकाश बालवडकर, राजेंद्र गट्यांनवार, घनशाम चौधरी, विठ्ठल मोरे, सुरेश ताके, शंकरराव लहारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिवेशनात करण्यात आलेले ठराव
साखरेचे दर 3500 रुपये करावे, इथेनॉलचे दर वाढवून द्यावे, 14 दिवसांत ऊस उत्पादकांना एफआरपीची एकरकमी रक्कम द्यावी, जनतेतून सरपंच व शेतकर्‍यांच्या मतावर बाजार समितीच्या निवडणुका व्हाव्यात, साखर कारखान्यावर आरआरसी दाखल झाल्यावर शेतकर्‍यांना ऊस बिलाच्या रकमा तातडीने मिळाव्यात, शेतकर्‍यांचे थकीत वीज बिल माफ करून शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, पिकाचा विमा 100 टक्के सरकारने भरावा, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे, शाळा व आरोग्य सुविधा ग्रामीण भागात सुरू कराव्यात. या मागण्यांचे ठराव यावेळी अधिवेशनात करण्यात आले. ते केंद्र व राज्य सरकारकडे पाठविले जाणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!