Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

शरद पवार- सोनिया गांधी यांची उद्या होणार दिल्लीत भेट

Share

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी नवी दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने हिंदुत्त्ववादी विचारधारा असणाऱ्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यायचा की नाही याचा फैसला होणार आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली सरकार करण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका पवारांनी घेतली आहे. काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे सोमवारची पवार- सोनिया यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार सोमवारी सायंकाळी चारनंतर सोनिया यांच्या भेटीला जातील. यावेळी प्रामुख्याने पवार महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे किती गरजेचे आहे याची माहिती देतील. तसेच शिवसेनेने भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएमधून फारकत घेतल्याचेही निदर्शनास आणून देतील. भाजपला आता सत्तेपासून दूर न ठेवल्यास तो पक्ष तपासयंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन पक्षसंघटना मजबूत करत आहे. यामुळे आता भाजपला रोखण्याची गरज असल्याचे पवार भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेते तयार आहेत. त्यांनी शिवसेनेसोबत चर्चा केली असून किमान समान कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहचला आहे. शिवसेनेसोबत काही मुद्यांवर मतभेद असले तरी शेती व त्याचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, मुस्लिम आरक्षण, आर्थिक मंदी, औद्योगिक विकास यासह काही मुद्यांवर एकमत आहे. वादांचे विषय पुढील पाच वर्षे बाजूला ठेवण्याचे शिवसेनेने मान्य केल्याचे पवार सोनिया यांना माहिती देतील. तसेच सत्तावाटप याबाबतही ते सोनियांशी सविस्तर चर्चा करतील.

सोनिया गांधी आणि शरद पवार यांची सोमवारी भेट झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समन्वय समितीची सत्तावाटपाबाबत मंगळवारी बैठक होणार आहे. या समितीत काँग्रेसकडून महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे, अहमद पटेल आणि सी. वेणूगोपाल तर राष्ट्रवादीकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत मंत्रिपदाच्या वाटपाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.

महाशिवआघाडीचे सरकार जवळपास निश्चित

शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. सोनिया गांधींच्या मनात शिवसेनेबाबत काही शंका आहेत. मात्र, पवारांच्या भेटीनंतर त्या दूर होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मंगळवारी सत्तावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित केला जाणार आहे. सध्या शिवसेनेकडे 64, राष्ट्रवादीकडे 54 तर काँग्रेसकडे 44 इतके आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह 15 मंत्रिपदे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्येकी उपमुख्यमंत्रीपदासह 14-14 मंत्रीपदाचा फॉर्म्यूला निश्चित झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होईल असा अंदाज बांधण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!