Friday, April 26, 2024
Homeनगरशनीशिंगणापुरातील कमिशन एजंटांवर आजपासून होणार कारवाई

शनीशिंगणापुरातील कमिशन एजंटांवर आजपासून होणार कारवाई

नव्या वर्षात शनीभक्तांना पोलीस,देवस्थानची भेट; अंमलबजावणीबाबत पार पडली बैठक

सोनई (वार्ताहर)- या आधी झालेल्या निर्णयानुसार शनिशिंगणापूर येथे कमिशन एजंटांवर ठोस कारवाई करण्याचा निर्णय काल शनीशिंगणापूर येथे झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला असून त्यामुळे आजपासून सुरू होणार्‍या नव्या वर्षात पोलीस व देवस्थानने शनीभक्तांना दिलेली ही भेट ठरणार आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, शनीशिंगणापूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना त्रासदायक ठरणारे कमिशन एजंट (लटकू) रस्त्यावर आणि गावातून हद्दपार होणार आहेत. या निर्णयाच्या नियोजनासाठी काल मंगळवारी संयुक्त बैठक पार पडली. यावेळी कमिशन एजंटांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.

मागील आठवड्यात यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत विश्वस्त मंडळ व वाहनतळ मालकांची बैठक झाली होती. त्या बैठकीत गडाख यांनी लटकूंमुळे गावाचे व शनिदेवाचे नाव खराब होत आहे. भाविकांनी पुन्हा पुन्हा येण्यासाठी हा प्रकार बंद होण्याची गरज असल्याचे सांगितले होते. बेरोजगार होणार्‍या या युवकांना पुजासाहित्य व्यावसायिकांनी काम द्यावे अशीही सूचना केली होती.

देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात काल नियोजन बैठक झाली. विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी प्रास्ताविक केले. दुकानदार रामेश्वर भुतकर, गणेश बेल्हेकर, सुधाकर वरघुडे, वाहनतळ मालक पोपट कुर्‍हाट, बापूसाहेब दाणे, विकास बानकर, भागवत बानकर, बाळासाहेब कुर्‍हाट उपस्थित होते. प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतील या निर्णयाचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी स्वागत केले.

बैठकीत शनीशिंगणापूरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी ‘लटकूं’ना ताब्यात घेतल्यानंतर तो ज्या दुकानात काम करतो त्या मालकावर व वाहनतळ मालकावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी लटकू थांबत असलेल्या ठिकाणी दोन पोलीस ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ व दुकानदार बैठकीस उपस्थित होते.आज एक डिसेंबरपासून पोलीस व सुरक्षा यंत्रणेची रस्ता व गावात गस्त राहणार आहे.

शिंगणापूर-राहुरी व शिंगणापूर-घोडेगाव रस्त्यावर ‘लटकूंच्या मोटारसायकली भाविकांच्या वाहनांचा पाठलाग करतात. यामुळे नेहमी रस्ता अपघात होतात. शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शाळेत जावे लागते. अडवणुकीचा हा प्रकार बंद करण्याच्या निर्णयाबद्दल विश्वस्त मंडळ, प्रशांत गडाख व पोलीस यंत्रणेला भाविकांनी धन्यवाद दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या