Monday, April 29, 2024
Homeनगर‘शबे बारात’ ची प्रार्थना सर्वांनी घरातच करावी

‘शबे बारात’ ची प्रार्थना सर्वांनी घरातच करावी

मौलाना ईमदादअली व मौलाना इर्शादुल्लाह यांचे आवाहन

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– मुस्लिम बांधवांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी प्रत्येक मनुष्याच्या जीवनातील अंदाजपत्रकाची रात्र गणली जाणारी ‘शबे बारात’ गुरुवारी रात्री साजरी होणार असून यावेळी ही रात्र सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी आपल्या घरात साजरी करावी. कब्रस्थानात कोणीही जाऊ नये, असे आवाहन जामा मशिदीचे प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना मोहम्मद ईमदादअली जियाई यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.

- Advertisement -

शबे बारातच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता मौलाना ईमदादअली यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपला देश आणि संपूर्ण जग संकटात सापडले आहे. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे त्यांच्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. शबे बारातच्या रात्री सर्व मुस्लिम बांधव कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या कबरीवर चादर चढवून तेथे दुआ करतात. मात्र यावर्षी कोरोनामुळे कोणीही कब्रस्तानात किंवा मशिदीत जाऊ नये.

मशिदीत होणारे प्रवचन, मिलाद पठण आणि कबरस्थानात जाण्याचे आणि तेथे होणारे सर्व उपक्रम यावर्षी स्थगित करण्यात आले असून सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी गुरुवारी शबे बारातच्या रात्री आपापल्या घरातच नमाज पठण, कुराण पठण, अल्लाहचे नामस्मरण करावे आणि घरातूनच आपल्या पूर्वजांसाठी दुआ करावी. कुणीही बाहेर निघू नये.

अहले सुन्नत वल जमातच्या कोणत्याही मशिदीमध्ये शबे बारातची नमाज होणार नाही. या निमित्ताने दरवर्षी होणारे कोणतेही उपक्रम या वर्षी होणार नाहीत. सध्या कोरोनामुळे सर्वत्र भीती आणि काळजीचे वातावरण आहे. प्रशासन याकामी जनतेच्या संरक्षणासाठी अहोरात्र राबत आहे.

प्रशासनाला सर्व मुस्लिम बंधू-भगिनींनी सहकार्य करावे व स्वतःचाही बचाव होण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये.आपल्या घरातील मुलाबाळांना सुद्धा बाहेर पडू देऊ नये, असे आवाहनही मौलाना ईमदादअली यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात प्रार्थना करून कोरोनापासून मुक्तीसाठी दुवा करावी. कुणीही बाहेर पडू नये. कब्रस्तानातील आपल्या पूर्वजांसाठी आपल्या घरातूनच दुआ करावी, असे आवाहन जमेअतुल उलेमा ए हिंद चे जिल्हाध्यक्ष मौलाना मोहम्मद इर्शादुल्लाह कास्मी यांनीही केले आहे. एका ठिकाणी फार लोकांनी एकत्र येऊ नये. सामाजिक अंतराचे भान ठेवून वैयक्तिकरित्या सर्वांनी आपली प्रार्थना करावी आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सर्व मशिदींच्या मौलानांना आवाहन
शहरातील सर्व मशिदींच्या मौलानांनी शबे बारातच्या रात्री मशिदीतून गर्दी होऊ देऊ नये. भाविकांना याबाबत योग्य असे मार्गदर्शन करून आपल्या घरात प्रार्थना करण्यासंदर्भात जागृती करावी, असे आवाहन जामा मशिदीचे विश्वस्त शेख शकूर ताजमोहम्मद, डॉ. राज शेख, तन्वीर रजा, मदरसा रहमत ए आलम चे विश्वस्त नगरसेवक हाजी अंजुम शेख, उस्मानिया मशिदीचे विश्वस्त रज्जाक पठाण, गफूर शाह, रफिक शाह, शेख खलील पिरमोहम्मद, मक्का मशिदीचे विश्वस्त नजीर मुलानी, निसार कुरेशी, जलालुद्दीन पिरजादे, गौसिया मशिदीचे बाबू मुस्तकीम कुरेशी, मुफ्ती अतहरहसन रिझवी, हाफिज अब्दुल हमीद, हाफिज मोहम्मद जोहरअली आदींनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या