Wednesday, April 24, 2024
Homeनगरपदाधिकारी निवडीप्रसंगी वादावादी

पदाधिकारी निवडीप्रसंगी वादावादी

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची नावे दोन दिवसांनंतर जाहीर होणार

राजूर (वार्ताहर)– अकोले तालुक्यातील राजूर येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदासह विविध पदाधिकारी निवडीसाठी बंद दाराआड मुलाखती पार पडल्या. या पदासाठी अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, याप्रसंगी झालेल्या वादावादीमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.

- Advertisement -

यावेळी एक बडा नेता आणि एक युवक कार्यकर्ता यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्याचे पडसाद उमटले. वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप दोन्ही गटांकडून करण्यात आला. शेवटी श्रेष्ठींनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला. जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दोन दिवसांनंतर तालुकाध्यक्ष पदाचा निर्णय होणार असुन पक्षाचे वाद चव्हाट्यावर आणुन पक्षाची प्रतिमा मलीन करु नका असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ नेते भानुदास तिकांडे, संपतराव नाईकवाडी, सुरेश खांडगे, संजय वाकचौरे, पोपटराव दराडे, विनोद हांडे आदी प्रमुख कार्यकर्ते तालुका अध्यक्ष पदासाठी स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांची निरिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

संदीप वर्पे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था टारगेट करावयाच्या असून जिल्हा बँक ताब्यात घ्यावयाची आहे. दादा तेथे लक्ष घालणार आहे. पुढील काळात नगरपंचायत ताब्यात घ्यायची असुन त्यावर पुढील आमदारकी अवलंबून असणार आहे. सोशल मिडियावर जाहीररित्या बोलु नका व पक्षाची प्रतिमा जपा.आपले नेतृत्व शरद पवार आहे. त्यामुळे कोणत्याही पैलवानाने नाद करायचा नाही.

पदाधिकारी निवड पारदर्शी होईल. कोणतीही विसंगती होणार नाही. राजुर, अकोले व पठारभागासाठी स्वतंत्रपणे कमिटी असेल. निवडीनंतर कोणीही नाराज होऊ नका. अकोले तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे आहे. असे सांगत वर्पे यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे.

शरद पवार व अजित पवार यांचे नेतृत्वाखाली आपण चांगले काम करत आहे. हे काम करताना कोणी अधिक कष्ट घेतले सर्वांना माहिती आहे. काही लोकांनी योगदान देऊन ते पुढे आले नाही, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार नसून विचार ऐकले जाणार आहे.सोशल मिडियाचा वापर करून पक्षाची बदनामी करू नका. बदनामी करणार्‍यांवर काय कारवाई करायची ते पाहून घेईल.
-आमदार डॉ. किरण लहामटे

कधी ना कधी पदाधिकारी निवडी करायच्या आहेत त्यामुळे जास्त वेळ लावु नका.अकोल्यातील कार्यकर्त्यांनी साठ हजार मतांनी आमदार निवडून आणत अनेक वर्षांच्या सत्तेला सुरूंग लावला.त्यामुळे कोणी नाराज होणार नाही.प्रत्येकाला काही ना काही पद देऊ.तालुक्यात नाही मिळाले तर जिल्ह्यात देऊ.कोणी नाराज होऊ नका.
– अशोकराव भांगरे, माजी जि.प.अध्यक्ष

या 24 जणांच्या मुलाखती
पोपटराव दराडे, बाळासाहेब आवारी, राजेंद्र कुमकर, आर. के. उगले, विनोद हांडे, अनिल वैद्य, कोंडाजी धोन्नर, दत्तात्रय धुमाळ,संजय वाकचौरे, नवले, दीपक वैद्य, संपत नाईकवाडी, रवी मालुंजकर, भानुदास तिकोडे, बबनराव तिकोडे, बाळासाहेब अंतारे, भागवत कुमकर, सुभाष हासे, अशोक एखंडे, गोरख कदम, संदीप शेनकर,सुरेश ठाणगे

- Advertisment -

ताज्या बातम्या