Monday, April 29, 2024
Homeनगरतीन वर्षांत 1 हजार शाळा खोल्या बांधणार

तीन वर्षांत 1 हजार शाळा खोल्या बांधणार

पालकमंत्री मुश्रीफ : अखर्चित 11 कोटी 94 लाखांचे पुनर्नियोजन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांना 1 हजार शाळा खोल्यांची गरज असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे येत्या तीन वर्षांत जिल्हा नियोजन समिती, शिर्डी संस्थान आणि आमदारांच्या 20 टक्के विकास निधीतून जिल्ह्यात 1 हजार शाळा खोल्या बांधण्याचा प्लॉन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री मुश्रीफ पत्रकार परिषदेत बोलत होते. 27 जानेवारी पूर्वी जिल्हा नियोजनच्या बैठका घेऊन आराखडे पाठविण्याच्या सूचना राज्याच्या अर्थविभागाकडून देण्यात आल्या. सत्ता स्थापनेच्या घडामोडीत बराच काळ गेला. त्यामुळे जिल्ह्यात येण्यास उशिर झाला. जिल्ह्याचा 2019-20 अंतर्गत 374 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. राज्य सरकारच्या नियोजन विभागाकडून मंजूर निधीपैकी अवघा 60 टक्के निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. यातून देखील 69 टक्के निधी खर्च झालेला आहे. यामुळे अखर्चित 11 कोटी 54 लाख रुपयांचे पुर्ननियोजन करण्यात आले आहे. अखर्चित राहिलेल्या निधी हा जलयुक्त शिवार, क्रीडा, ग्रामीण रुग्णालय, इतर जिल्हा मार्ग आणि अपारंपारिक ऊर्जा या विभागाचा असल्याची माहितीमंत्री मुश्रीफ यांनी दिली.

जिल्ह्यात प्रमुख्याने रस्ते आणि विजेचा मोठा प्रश्‍न आहे. यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात येणार असून 30-54, 50-54 या रस्त्यांच्या कामाच्या लेखाशिर्षात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. 30-54 चा शंभर टक्के निधी जिल्हा परिषदेला देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय सोडून सर्वांनी एकत्र येत राज्यात एक नंबरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.

पुरातन वास्तूच्या दुरूस्तीसाठी 1 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यातून भुईकोट किल्ल्यासाठी निधी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. थेट जनतेतून सरपंच निवडीला आपला विरोध आहे. मुख्यमंत्री आमदारातून, तर पंतप्रधान खासदारांमधून निवडतात. माग सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून का? असा सवाल उपस्थित करत यामुळे संबंधित गावाच्या विकासावर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन समितीच्या बैठकीनंतर काही सदस्यांनी नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील विजेचे बंद पडलेले रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी एक कोटी रुपये नियोजनमधून देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. रोहित पवार, आ. आशुतोष काळे, आ. नीलेश लंके, आ. संग्राम जगताप, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि अधिकारी उपस्थित होते.

आमच्या कोल्हापुरात असंच चालतं..
नियोजन बैठकीत पत्रकारांच्या प्रवेश बंदीबाबत बोलताना कोल्हापुरातही अशीच पद्धत आहे. बैठक झाल्यानंतर माहिती सांगितली जाते, असे सांगून मुश्रीफ शेजारी बसलेल्या माजीमंत्री पाचपुते यांना म्हणाले, हे आमच्या पक्षाचे नेते होते. त्यांच्याच काळात ही प्रथा राज्यभर पडली, असे सांगत बैठकीत हशा पिकवला. आता दर महिन्याला जिल्ह्यात आढावा बैठक आपण घेणार असल्याचा निर्वाळा दिला.

कुकडी कालवा दुरुस्तीचा सर्व्हे
कुकडी कालवा दुरुस्तीसंदर्भात लक्ष वेधले असता, मुश्रीफ म्हणाले, कुकडी कालव्या अंतर्गत जिल्ह्यातील मोठे लाभक्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र कालव्याच्या नादुरुस्तीमुळे निश्‍चित असलेले पाणी पुरेशा दाबाने पोहचू शकत नाही. ही बाब आपल्या निदर्शनास आली आहे. याबाबत तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले आहे. हे काम तत्काळ मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू.

विभाजनाचे महसूल मंत्र्यांना विचारा
जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर पालकमंत्री मुश्रीफ यांना छेडले असता त्यांनी महसूलमंत्री तुमच्या जिल्ह्याचे आहेत. त्यांनाच याबाबत विचारा असे सांगत,शिर्डीच्या विषयावर श्रध्दा आणि सुबरी एवढाच सल्ला त्यांनी दिला. तसेच के. के. रेंजच्या विस्तारीकरणाबाबत सरकारला शेतकर्‍यांचा विरोध कळविला असून याबाबत सविस्तर माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जलयुक्त, चारा छावण्या अन् पाणी टँकरची होणार चौकशी

जलयुक्त शिवार योजनांमध्ये झालेल्या कामांची, जिल्ह्यात उन्हाळ्यात सुरू असलेल्या चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरचा ठेकेदार आणि त्याने टाकलेल्या पाण्याच्या खेपांची चौकशी करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे या तिनही योजनांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला होता. त्यानुसार जलयुक्त शिवार, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरचा ठेकेदार यांची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आ. रोहित पवार यांनी केली. पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती देतांना आ. पवार म्हणाले, आधीच्या सरकारमधील एका मंत्र्याने जलयुक्तत शिवार योजनेबाबत आरोप केले होते. यामुळे आता या योजनेची चौकशी होणे आवश्यक आहे. यासह टंचाईच्या काळात पाण्याच्या टँकरचा ठेका एकाच ऐजन्सीला देण्यात आला. त्याने निट काम केले असते, निट पाण्याच्या खेपा टाकल्या असत्या तर मला कर्जत-जामखेड मतदारसंघात 100 पेक्षा जास्त टँकर देण्याची वेळ आली नसती, असे आ. पवार यांनी सांगितले. यामुळे तिनही योजनांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेनंतर राम शिंदे यांच्या वक्तव्याबाबत आ. रोहित पवार यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा माझ्या कर्जत-जामखेड मतदार संघातील लोक काय म्हणतात, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे. शिंदे यांना दुसरा कुठलाही विषय मिळत नसल्यामुळे ते माझ्याबाबत बोलत असतील. माझ्या मतदारसंघातील जे लोक 30 वर्षांपासून विकासापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी काय करता येईल, याकडे लक्ष देत असल्याचेे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या