Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

राजकीय शनि‘वार’ !

Share
पुणतांब्यात उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू, Latest News Puntamba Upsarpanch Change puntamba

अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळावर आरोप-प्रत्यारोपांचे तरंग उठले. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वारंवार भाकीते खोटे ठरत असल्याने ज्योतिषी बदलण्याचा सल्ला देताना जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी आ.राधाकृष्ण विखे यांनाही चिमटा काढला. देवेंद्र फडणवीस यांनीही ना.थोरातांच्या सल्ल्याला काही तासांच्या अंतराने नगरमध्येच उत्तर दिले.

शनिदर्शनासाठी पोहचलेले भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या मनातील राग शनीदेवाच्या साक्षीने पुन्हा प्रकट झाला. भाजपा नव्हे तर फडणवीस टिमवर आपण नाराज आहोत, असे सांगत भाजपातील अंतर्गत वादाची धग कायम असल्याचे संकेत दिले. एकीकडे राजकीय नेते एकमेकांना बोल लावत असताना भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनीही माजी मंत्री पंकजा मुंडेवर निशाणा साधला.

फडणवीस यांनी नवा ज्योतिषी शोधावा

ना. बाळासाहेब थोरात : आ.विखेंना काढला चिमटा

राजकीय शनि‘वार’ !, Latest News Saturday Political War Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- ‘विधानसभा निवडणुकीत 220 च्यावर जागा येतील’, ‘मी पुन्हा येईल’, ‘महाविकास आघाडीचे सरकार सहा महिनेही टिकणार नाही’, अशी भविष्यवाणी करणार्‍या माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता नवीन ज्योतिषी शोधावा. त्यांच्या सर्वच्या सर्व अंदाज चुकत आहेत. विरोध करणे हा विरोधकांचा एकमात्र पिंड आहे, असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. निवडणुकीआधी भाजपने मोठ्या प्रमाणात आवक केली.

आता ती आवक सांभाळण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. काही आवक परतीच्या मार्गावर आहे. पण त्यांनी काही काळ त्या ठिकाणीच राहावे, असे सल्ला देत त्यांनी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनाही नाव न घेता चिमटा काढला. भाजपच्या अधोगतीला सुरूवात झाली आहे, असेही ते म्हणाले.

नगरच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ना. थोरात म्हणाले, राज्यातील सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणून महसूलकडे पाहिले जाते. या विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांमध्ये सहजता आणणे हा उद्देश आहे. त्यात मालमत्तासंदर्भात नागरिकांना लागणारी कागदपत्रे सहजतेने उपलब्ध होऊ लागली आहेत. मागील सरकारच्या काळात त्यात गती राहिली नव्हती. आमचे सरकार गती वाढविणार आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

भाजपाच्या सत्ताकाळात शेतकर्‍यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा झाली. त्यात भरमसाठ अटी, शर्तीची माळ घातली. त्यामुळे शेतकर्‍यांना कोणताही दिलासा मिळाला नाही; परंतु महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही अटी, शर्ती न घालता दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. दोन लाखांपुढील कर्ज, नियमित फेड करणारे शेतकरी यांच्यासाठीही सरकार योजना आणणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असे थोरात यांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी पुरोगामी विचारांचे आहे. काँग्रेसची राजनीतीही राज्यघटनेला धरून आहे. विद्यार्थ्यांवरील हल्ला म्हणजे, लोकशाहीवर झालेला हल्ला आहे. हा घटनेचा आपण निषेध करतो. नागरिकत्व कायदा राज्यात लागू होऊ नये, या मताशी आम्ही ठाम असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.

म्हणून पालकमंत्रीपद नको
पालकमंत्री निवडीबाबत थोरात म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. यासह पक्षाचा विधमंडळाचा सदस्य असून महसूलमंत्रीपद आहे. पक्षात एकाच व्यक्तीकडे सर्व असावे, या मताचा मी नाही. त्यामुळे पालकमंत्रीपद मला नकोच आहे. स्थानिक पालकमंत्रीपद मिळाले नाही, म्हणून कोणतीही नाराजी नाही. त्याऐवजी पक्षाने तरुणांना ही जबाबदारी द्यावी, हाच त्यामागील हेतू आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे लवकर उद्घाटन
नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम 28 कोटींच्या निधीअभावी मागील पाच वर्षांत रखडले आहे. नूतन इमारतीचा पाया आपणच खोदला होता. आता त्याचा कळसही आपणच चढविणार आहोत. लवकरच नूतन इमारतीच्या निधीचा प्रश्न मार्गी लावू. इमारतीचे उद्घाटनही आपल्याच हातून होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

थोरात यांना योग्य वेळी उत्तर देऊ : फडणवीस

धावती भेट : जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवर चर्चा टाळली

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला योग्यवेळी उत्तर देईल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. नगर येथे शनिवारी दिलेल्या धावत्या भेटीत रखडलेल्या जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर चर्चा न झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला.

विरोधी पक्षनेते फडणवीस औरंगाबाद येथे जात असताना नगर शासकीय विश्रामगृहावर काही काळ थांबले. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, नगरसेवक भैय्या गंधे, सचिन पारखी, सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाजपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल फडणवीस यांना विचारले असता, योग्य वेळ आल्यावर मी बोलेल, असे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या निवडी शुक्रवारी (दि.10) होणार होत्या. मात्र त्या रखडला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची नगरला धावती भेट झाली. पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन सुमारे दहा मिनिटे बंद खोलीमध्ये चर्चा केली. चर्चा काय झाली, हे समजू शकले नसले, तरी जिल्हाध्यक्ष निवडीवर काहीच चर्चा झाली नसल्याचे मात्र काही पदाधिकार्‍यांनी सांगितले.

भाजपातील फडणवीस टिमवर नाराज

शनीचरणी लीन खडसेंचा पुन्हा निशाणा

सोनई (वार्ताहर)- मी भाजपावर नाराज नसून पक्षातीलच फडणवीस यांच्या टीमवर नाराज आहे. वेळ आल्यावर मनातील रोष व्यक्त करणार असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला.

शनिवारी दुपारी खडसे सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी उदासी महाराज मठात महापूजा करून शनिला अभिषेक घातला. त्यानंतर त्यांनी चौथर्‍यावर जाऊन शनिदर्शन घेतले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर उपस्थित होते.

खडसे म्हणाले, मला भाजपने खूप काही दिले. मी पक्षावर नाराज नाही. गेल्या पाच वर्षापासून माझ्यावर अन्याय होत आहे. पक्षाकडून नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर असणार्‍या गटाकडून माझ्यावर अन्याय होत आहे. यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत परळी येथील सभेत काही मुद्दे सांगितले. याविषयी योग्य वेळी अधिक सविस्तर बोलणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दोन्ही पक्षांकडून चुका झाल्या

विधानसभेत जनतेने भाजप-सेना युतीला कौल दिला होता. परंतु, सरकार स्थापन करताना दोन्ही पक्षाकडून चुका झाल्या. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. सध्याचे सरकार हे तीन विचारांची खिचडी असून ते फार काळ टिकणार नाही, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!