Friday, April 26, 2024
Homeनगर‘सारी’चे रुग्ण शोध मोहीम गतिमान

‘सारी’चे रुग्ण शोध मोहीम गतिमान

तालुकानिहाय पथके स्थापन । घरोघरी होतेय सर्वेक्षण

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्वसन विकाराचा तीव्र त्रास होत असणार्‍या (सारी) रुग्णांची रुग्णालयापर्यंत येण्याची वाट न पाहता आरोग्य विभागाने विविध पथके स्थापन करून ग्रामीण आणि नागरी भागात सर्वेक्षण करून आजाराची लक्षणे असणार्‍या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले होते. त्यानुसार, जिल्ह्यात तालुकानिहाय विविध पथके स्थापन करून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाबरोबरच जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळून येत असल्याने या रुग्णांना शोधून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या दवाखान्यात आलेल्या अशा रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठविण्याबाबत आदेशही जारी करण्यात आले होते.

मात्र, या आजाराची लक्षणे असणारे रुग्ण रुग्णालयात पोहचेपर्यंत ते इतरांना प्रादुर्भाव पोहचवू शकतात, हे लक्षात घेऊन प्रशासनाने अशा रुग्णांची शोध मोहीमच सुरू केली आहे. लगतच्या जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हाच जिल्हा प्रशासनाने हे काम सुरू केले होते. आता ही मोहीम अधिक गतीमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिले आहेत.

रुग्णाची तब्बेत बिघडली तरच ते रुग्णालयाकडे धाव घेतात. तोपर्यंत संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा रुग्णांसाठी यंत्रणेने सकारात्मक पुढाकार घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, अशा सूचना द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. त्यानंतरच रुग्ण शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी नागरी आणि ग्रामीण भागांसाठी स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी कार्यक्षेत्रात अशा प्रकारची पथके स्थापन करण्यात आली आहेत.

संगमनेर, राहुरी, श्रीरामपूरमध्ये पथके कार्यान्वित
संगमनेरमध्ये 220 पथके तयार केली गेली आहेत. त्यात नगरपालिका क्षेत्रातील 20 आणि ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी 200 पथके राहणार आहेत. ही पथके दररोज प्रत्येकी 50 घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करत आहेत. दररोज सुमारे 55 ते 60 हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. या पथकांवर निरीक्षणासाठीही वेगळे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. सारीची लक्षणे असणार्‍या अशा रुग्णांवर उपचारासाठी संगमनेरमध्ये खास क्लिनिक तयार केले आहे. राहुरीमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. तालुक्यात एकूण 217 पथके तयार झाले आहेत. नगरपालिका क्षेत्रातील 17 आणि ग्रामीण भागातील 200 पथकांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. मॅपिंगद्वारे हे पथक कुठे जाते आणि किती घरांना भेटी देते हे ऑनलाईन पद्धतीने पाहिले जात आहे. राहुरी मध्येही दररोज सुमारे 50 हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. श्रीरामपूरमध्ये नगरपालिका क्षेत्रासाठी एक पथक तर ग्रामीण भागासाठी 177 पथके कार्यरत आहेत. कर्जत ब्लॉकमध्ये ग्रामीण भागातील 196 सर्वेक्षण पथके आणि शहरी भागातील 19 पथके सारीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. त्यासाठी 26 पर्यवेक्षकांमार्फत पर्यवेक्षण केले जात आहे. पाथर्डी तालुक्यात ग्रामीण भागातील 175 आणि शहरी भागातील 10 पथके सारी आजारावर पाळत ठेवण्याचे काम करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या