Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या वक्तव्याने राजकारण तापले

संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकारण तापले

इंदिरा गांधी आणि उदयनराजेंबाबतच्या विधानाने नाराजी

मुंबई – ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, अशी मागणी केली होती. त्यावर सातार्‍याचे माजी खासदार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने पक्षाचे नाव ठेवताना आमची परवानगी घेतली होती का?, असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

- Advertisement -

बुधवारी पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये संजय राऊत यांनी, उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असा टोला लगावला तसेच माफिया डॉन करीम लाला याला इंदिरा गांधी भेटायला जात असत असे म्हटले या वक्तव्यावरुन आता वक्तव्यामुळे वादंग उठले आहे.

उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. ते भाजपाचे माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. त्यांनी आपण शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत. गणपती, विष्णूची पूजा करताना वंशज असावं लागत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आम्ही सातारा, कोल्हापूरमधील गादीचा आदर करतो. महाराजांचं नाव जिथे येतं तिथे आम्ही नतमस्तक होतो. शिवाजी महाराजांच्या नावाने बाळासाहेबांनी एकजुटीचं काम पुढे नेलं, असे राऊत म्हणाले. तर इंदिरा गांधी करीम लाला यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जात असत, असे वक्तव्य राऊत यांनी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी राऊत यांच्या या वक्तव्याबाबत नाराजीही व्यक्त केली. संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी, तसेच राऊत यांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे असे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांकडून केले जात आहे.

संजय राऊत यांनी वक्तव्य घेतले मागे
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व कुख्यात डॉन करीम लाला यांच्या भेटीबद्दलचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतलं आहे. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी माघार घेतली आहे. इंदिरा गांधी यांच्याबद्दल मी केलेल्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरेंकडून राऊतांची पाठराखण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल वक्तव्य केल्याने चहुबाजूंनी टीकेचे धनी झालेल्या खासदार संजय राऊत यांची पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली आहे. ‘ते एका वेगळ्या संदर्भाने ते बोलले होते. पत्रकार म्हणून त्यांचे ते निरिक्षण होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच इंदिरा गांधींचा आदर केला आहे. त्यामुळे कुठलाही शिवसैनिक त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. राऊत यांचा हेतू साफ होता,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या