Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सॅनिटायझरचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान

Share

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ : अन्न औषधकडून मेडिकल्सची तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी)– कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. तर, काही लोकांकडून या संधीचा फायदा उठविला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॅण्ड सॅनिटायझर व मास्कची मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे जिल्ह्यात चढत्या दराने सॅनिटायझर, मास्क विक्रीच्या घटना घडत आहेत. पुणे व औरंगाबादमध्ये अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून सॅनिटायझरचा मोठा साठा जप्त केला आहे.

तर, नगर जिल्ह्यात सॅनिटायझर व मास्कच्या तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी काम करत आहेत. जिल्ह्यातील मेडिकल तपासणी, जनजागृती करणे, सॅनिटायझर व मास्कचा तुटवटा होणार नाही, यांची खबरदारी घेण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू आहे.

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. तर, 13 लोकांना जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची लागण होऊ नये म्हणून स्वच्छतेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वेळोवेळी सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत. सॅनिटायझरची मागणी वाढली असल्याने बाजारात बनावट सॅनिटायझर विक्रीसाठी येऊ लागले आहेत.

यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मेडिकलमध्ये सॅनिटायझर उपलब्ध आहे का?, उपलब्ध सॅनिटायझर बनावट आहे का? याची तपासणी केली जात आहे. डॉक्टरची चिठ्ठी असेल तर मास्क देण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाकडून मेडिकल चालकांना देण्यात येत आहेत.

सध्या जिल्हामध्ये सॅनिटायझरचा व मास्कचा तुटवटा नसला तरी मोठ्याप्रमाणात बाजारात बनावट सॅनिटायझरची मोठ्याप्रमाणात विक्री होत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून मेडिकलच्या चालकांना विक्रीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सॅनिटायझरी अधिकृत उत्पादन करणारी सुपा (ता. पारनेर) येथे एकच कंपनी आहे. या कंपनीकडून जिल्ह्यामध्ये सॅनिटायझरचा पुरवठा केला जात आहे. तर, शिर्डी संस्थानकडे सॅनिटायझरचा साठा असून जिल्ह्यात कोठेही सॅनिटायझरची गरज पडली तर शिर्डी संस्थानचा साठा उपलब्ध केला जाणार आहे.

एटीएममध्ये सॅनिटायझर ?
अनेक ठिकाणी एटीमएममध्ये थम्ब देऊन पैसे काढण्याची सोय आहे. कोरोना संसर्गात हात हा महत्त्वाचा फॅक्टर असल्याने जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेत एटीमएममध्ये सॅनिटाझर ठेवणार का? याबाबत विचारणा केली असता, याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी आवश्यकता असेल तरच मास्कचा वापर करावा. अधिकृत कंपनीचे लेबल असलेले सॅनिटायझर मेडिकल मधून खरेदी करावे व त्याचे बिल घ्यावे. जिल्ह्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी याबाबत जनजागृती करत असून प्रत्येक तालुक्यात पथकाकडून मेडिकल्सची तपासणी केली जात आहे. तसेच, अवैधरित्या सॅनिटायझरची विक्री किंवा साठा केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!