Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : 109 पैकी 105 अहवाल निगेटिव्ह

Share
Jalgaon

शहरात 6 ते 14 एप्रिल पर्यंत दुचाकी व चार चाकी वापरण्यावर प्रतिबंध

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यात आज अखेर 109 व्यक्तींना सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे स्वॅब टेस्टकरीता पाठविण्यात आलेले होते. त्यापैकी 4 व्यक्तींना कोरोना विषाणूची बाधा झालेली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उर्वरित 105 व्यक्ती यांना कोणतीही बाधा झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. तसेच संगमनेर शहर व तालुक्यात 3 ते 5 एप्रिल हे तीन दिवस जनतेने संचारबंदीचे काटेकोरपणे पालन केल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहे. आगामी काळातही जनतेचे सहकार्य असेच अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 14 एप्रिल 2020 पर्यंत लॉक डाऊन घोषित केला आहे. त्याअंतर्गत केवळ जीवनावश्यक वस्तुंचा अपवाद केलेला आहे. लॉकडाऊन परिणामकारकरित्या अंमलात यावा याकरीता फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 मधील तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत.

यानुसार विनाकारण घराबाहेर वावर करताना कोणतीही व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तरी जनतेने 14 एप्रिल पर्यंत संचारबंदीचे संपूर्णतः पालन करावे, जीवनावश्यक वस्तु खरेदी करावयाची असल्यासच केवळ घराच्या बाहेर योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित अंतराने तत्व पालन करुन निघावे. जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी प्रत्येक भागातील घरपोच सेवा देणारे किराणा दुकानदार, दुध व्यवसायीक व भाजी विक्रेते यांचे संपर्क क्रमांक प्रशासनाने प्रसिद्ध केलेले आहेत.

त्यांच्याशी संपर्क साधून जीवनावश्यक वस्तु घरपोच उपलब्ध करुन घ्याव्यात. व शक्यतो घराबाहेर निघणे टाळावे, दिनांक 3 ते 5 एप्रिल 2020 या कालावधीत संगमनेर शहर व तालुक्यातील संपूर्ण जनतेने उत्स्फूर्तपणे 100 टक्के संचारबंदीचे पालन केले, याबाबत प्रशासनातर्फे तमाम जनतेचे आभार मानन्यात येत आहे. तसेच दिनांक 6 एप्रिल पासून किराणा माल विक्रेते, औषध विक्रेते हे सकाळी 11 ते दुपारी 4 या कालावधीत काऊंटर वरील विक्री करणार असून सर्व व्यापार्‍यांनी जास्तीत जास्त प्रमाणात घरपोच सेवा देण्याचा मानस केलेला आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी एकट्याने पायी जाता येणार आहे.

दिनांक 6 एप्रिल ते 14 एप्रिल पर्यंत नागरीकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन संगमनेर शहरात वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. नागरीकांनी जीवनावश्यक वस्तु आपल्या लगतच्या भागातूनच पायी जावून प्राप्त करुन घ्याव्यात. वरील कालावधीत दुचाकी किंवा चार चाकी वाहन वापर करीत असल्याचे आढळून आल्यास सदरचे वाहन जप्त केले जाऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी शक्यतो घरपोच सेवेचाच लाभ घ्यावा, किंवा घरालगतच्या दुकानातून पायी जाऊन जीवनावश्यक वस्तु विकत घ्याव्यात.

किरकोळ भाजीपाला विक्रेते हे केवळ हातगाडीचा वापर करुन घरोघर भाजीपाला विक्री करतील. एका जागी भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यास मुळीच परवानगी असणार नाही. भाजीपाल्याचा जाहीर लिलाव (मोंढा) हा सकाळच्या वेळी नेहरु चौकात आयोजीत करण्यात येत होता. परंतु तो दिनांक 6 एप्रिल ते 14 एप्रिल 2020 पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर येथे सकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजीत करण्यात येणार आहे. यासाठी केवळ किरोकोळ भाजी विक्रेते यांना प्रवेश असणार आहे. सामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रवेश असणार नाही. तरी भाजीपाला लिलावासंदर्भात शेतकरी, घाऊक, व्यापारी व किरकोळ व्यापारी यांनी नोंद घ्यावी.

आपत्कालीन परिस्थितीचा विचार करुन संपूर्ण उपाययोजना प्रशासनाने केलेल्या असून आपत्कालीन उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. काल महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळणार्‍या प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन कोव्हिड -19 संदर्भातील करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

कोरोना विषाणुला हरविण्यासाठी प्रशासन सज्ज असून सदरचा लढा नागरिकांच्या सहकार्याशिवाय जिंकता येणार नसल्याने सर्व नागरीकांनी आपआपल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, वैयक्तीक स्वच्छता व सामाजिक सुरक्षित अंतर या तत्वांचे पालन करावे, प्रशासन सज्ज असल्याने कोणतीही काळजी करु नये, परंतु आवश्यक ती दक्षता घेऊन घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!