Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरात पोलिसांच्या ताब्यातील वाहनांची होतेय विक्री

Share

वाहनांचे सुटे भागही गायब, सूत्रधाराच्या शोधाची गरज

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – तहसीलदारांच्या ताब्यातील ट्रॅक्टरची चोरी झाल्याचे प्रकरण उघडीस आल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. पोलिसांनी जप्त करून आपल्या ताब्यात ठेवलेल्या वाहनांची व या वाहनांच्या स्पेअर पार्टचीही चोरी केली जात असल्याचे वृत्त आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार होत असल्याने या चोरीचा सूत्रधार कोण आहे व त्याला कोण पाठीशी घालत आहे, याचा वरिष्ठ अधिकार्‍यांनी शोध घेण्याची गरज आहे.

संगमनेर पोलीस वसाहतीमध्ये जप्त केलेला ट्रॅक्टर लावण्यात आला होता. या ट्रॅक्टरची चोरी झाल्याचे वृत्त ‘सार्वमत’ मध्ये प्रसिद्ध होताच अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर वेगवेगळी चर्चा ऐकावयास मिळत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करून जप्त केलेली वाहने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येतात.

काही वाहने पोलीस वसाहतीच्या रिकाम्या प्रांगणात तर काही वाहने प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस प्रांगणात तर काही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात येतात. जप्त केलेल्या वाहनांमध्ये जीप, ट्रॅक्टर, रिक्षा व मोटरसायकलची संख्या मोठी असते.

या वाहनांवर कारवाई झाल्यानंतर पंचनामा करून ही वाहने वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतात. ही वाहने वर्षानुवर्षे याठिकाणी पडून असतात. नेमका याचा गैरफायदा काही जणांनी घेण्यास सुरुवात केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अनेक रिक्षा आता सापडत नाहीत या रिक्षा नेमक्या गेल्या कुठे याची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही, याची नोंदही नाही सापडत नाही.

प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आलेल्या अनेक वाहनांचे सुटे भाग गायब होत आहेत. वाहनांचे मशीन, टायर व इतर स्पेअर पार्ट काढून त्यांची विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. वाहनाच्या सुट्या भागांची चोरी नेमकी कोण करतो, त्याला कुणाचा आशीर्वाद आहे याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी घेऊन सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे बोलले जाते.

शासकीय कार्यालयात वॉचमनची नियुक्ती केलेली असते, वाहनांच्या स्पेअर पार्टची चोरी होत असताना संबंधित कर्मचारी नेमके काय करतात? या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे चालू करून फुटेजची तपासणी केली तर वाहन चोरीचा सूत्रधार पकडला जाईल, गेलेला माल कोण खरेदी करतो त्याचा तपास केल्यास महत्त्वाची माहिती मिळू शकते असे बोलले जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!