Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरः 13 हजार 227 व्यक्तींची होणार तपासणी, बंद कडकडीत

Share
संगमनेरः 13 हजार 227 व्यक्तींची होणार तपासणी, बंद कडकडीत, Latest News Sangmner People Cheking Close City

आश्वी बुद्रूकमध्येही तपासणी मोहिम

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यात चार व्यक्तींना कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव झाला असल्याबाबतचा अहवाल पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था मार्फत प्राप्त झालेला आहे. चार रुग्णांपैकी तीन व्यक्ती या संगमनेर शहरातील तर 1 व्यक्ती आश्वी बुद्रूक येथील आहे. या व्यक्तींच्या नजीकच्या संपर्कातील 31 व्यक्ती सामान्य रुग्णालय अहमदनगर येथे पुढील तपासणीकामी पाठविल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

संगमनेरातील ज्या भागात कोव्हिड 19 बाधीत व्यक्ती आढळून आलेल्या आहेत त्या भागाचा कंन्टेनमेंट प्लॉन तयार केलेला असून यामध्ये संपूर्ण परिसर नियंत्रित करण्यात आलेला आहे. या भागातील सर्व नागरिकांना घरीच अलगीकरण करण्यात आलेले असून या नागरिकांनी घरीच राहावे म्हणून जीवनावश्यक वस्तु घरपोहोच व्यवस्था करण्यात आलेली आहे. संगमनेर शहरातील नियंत्रीत केलेले भागात एकूण 2512 घरे असून 13227 व्यक्ती आहे. या भागातील 100 टक्के व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

याकरीता 13 पथक निर्माण केले आहेत. तसेच यासाठी खासगी वैद्यकीय व्यवसायीक हे स्वच्छेने सामाजिक बांधिलकीतून या तपासणी मोहिमेमध्ये सहभागी होणार आहे. या तपासणीमध्ये कोव्हिड 19 संदर्भातील लक्षणांची विशेषत्वाने तपासणी केली जाणार आहे. व प्रत्येक व्यक्तीला औषधोपचार पुरविला जाणार आहे.

याच प्रकारचा कंन्टेनमेंट प्लॅन आश्वी बुद्रूक गावासाठी देखील तयार करण्यात आलेला आहे. या भागात 427 कुटुंब संख्या असून एकूण 1929 लोकसंख्या आहे. या संपूर्ण व्यक्तींची आरोग्य तपासणी करीता सहा वैद्यकीय पथक निर्माण करण्यात आलेले आहेत. भविष्यातील उपायायोजना म्हणून वृंदावन हॉस्पीटल चंदनापुरी घाट, सिद्धकला हॉस्पीटल संगमनेर ख़ुर्द, संजीवनी हॉस्पीटल संगमनेर व अमृतवाहिनी रुरल हॉस्पीटल घुलेवाडी येथे संस्थात्मक अलगीकरण कक्ष तयार करण्यात आलेले आहे. संशयीत व्यक्तींना या ठिकाणी अलगीकरण करण्यात येणार आहे. डॉक्टर व आरोग्य पथकासाठी आवश्यक एन-95 मास्क, पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमॅट, गॉगल, ग्लोव्हस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या खर्चाने प्रशासनास उपलब्ध करुन दिले आहेत.

संभाव्य परिस्थितीचा विचार करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या असून उद्भवणार्‍या परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे. परंतु कोव्हिड 19 अर्थात कोरोना विषाणुचा लढा लोकांच्या सहकार्याशिवाय जिंकता येणार नसल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे यासाठी अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर निघावे, अत्यावश्यक सेवा घरपोहोच उपलब्ध करुन द्याव्यात, वैयक्तीक स्वच्छतेसह कुटुंबाची काळजी घ्यावी, प्रशासन सज्ज असल्याने काळजी करु नये, परंतु आवश्यक ती दक्षता घरी थांबुनच घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.

13 पथक करणार तपासणी
नगरपालिका व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधिक्षक डॉ. भास्कर भवर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली 13 पथक नेमण्यात आली आहेत. यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेश घोलप, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कचेरीया, डॉ. किशोर पोखरकर, डॉ. पुनम निघुते पर्यवेक्षक, आशा सेविका यांचा समावेश आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!