Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोलेतील निळवंडे कालव्यांच्या कामाची खा. लोखंडेंकडून पाहणी

अकोलेतील निळवंडे कालव्यांच्या कामाची खा. लोखंडेंकडून पाहणी

संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर-अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांची कामे गेली 47 वर्षांपासून रखडलेली होती. गेली 10 वर्षांपासून कामांचा ठेका देऊन नाममात्र काम झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामाला चांगली गती आली आहे. अकोले तालुक्यातील कामांबरोबरच संगमनेर, राहुरी तालुक्यातील कामांच्या सद्यस्थितीची पाहणी दौरा खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्ते समवेत केला. दौर्‍यावेळी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी अकोले तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांच्या कामांना आता चांगली गती आल्याचे निदर्शनास आले.

दौर्‍याच्या सुरुवातीला निळवंडे धरणा जवळील विश्रामगृहात अधिकार्‍यासमवेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी बैठक घेतली. बैठकीत कामाची सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कामात असलेल्या अडचणी खासदार लोखंडे यांनी समजून घेतल्या. कार्यकारी अभियंता भरत शिंगाडे यांनी अकोले तालुक्यातील प्रत्येक किलोमीटरनुसार कामाची माहिती दिली. तर कार्यकारी अभियंता गिरीश संघानी यांनी अकोले तालुका वगळता इतर तालुक्यांतील कामांची माहिती दिली. त्यानंतर कालव्यांच्या कामाची पाहणी करण्यात आली. सुरुवातीच्या तीन किलोमीटरचे काम वेगाने सुरू असून तीन ते सतराव्या किलोमीटर पर्यंत कालवा उकरण्यासाठी पंधरा पोकलेन मशीन काम करत आहेत.

- Advertisement -

दौर्‍यादरम्यान सतराव्या किलोमध्ये एक किलोमीटरच्या काँक्रिटकामाचे भूमिपूजन खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील कामाची पाहणी करण्यात आली. खासदार लोखंडे यांच्यासह समितीच्या कार्यकर्त्यांनी उजव्या कालव्यावरील पानोडीसह राहुरी पर्यंत सुरु असलेल्या कामांना भेटी दिल्या. कालव्यांच्या कामात कोणतेही अडचण आली तर आपण नेहमी खंबीर पणे उभे राहणार असल्याचे लोखंडे यांनी जलसपंदा अधिकार्‍यांना सांगितले.

पाहणी दौर्‍यात निळवंडे पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष नानासाहेब शेळके, सचिव विठ्ठल घोरपडे, उत्तमराव घोरपडे, नाशिक जिल्हा प्रमुख भाऊसाहेब शिंदे, सुखलाल गांगवे, मोहनराज शेळके, प्रभाकर गायकवाड, सदाशिव थोरात, शिवाजी शेळके, विलास गुळवे, अण्णासाहेब वाघे, सुभाष शेळके, शाम सोनवणे, बाळासाहेब शेळके, सोमनाथ घोरपडे, विश्वनाथ शेळके, चांगदेव शेळके, रंगनाथ निर्मळ, भिकाजी शेळके, जलसंपदा विभागाचे प्रमोद माने, बाळासाहेब खर्डे, मनोज डोके, असिफ शेख अमोल कवडे, रोहित कोरे, विवेक लव्हाट, तांबोळी आदी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री व जलसंपदामंत्र्यांकडे बैठक
कालव्यांच्या कामात काही ठिकाणी किरकोळ अडचणी आहेत. याशिवाय पुणे-नाशिक, समृद्धी महामार्ग, नगर-मनमाड रोड, शेवटच्या टप्प्यातील रेल्वे क्रॉसिंगसह विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे संबंधित अधिकार्‍यांसह संयुक्त बैठक लावणार असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या