Friday, April 26, 2024
Homeनगरसंगमनेरात गुटखा विक्री दुकानावर छापा, 62 हजाराचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात गुटखा विक्री दुकानावर छापा, 62 हजाराचा मुद्देमाल जप्त

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – गुटखा विक्रीसाठी बंदी असतानाही खुलेआम गुटखा विक्री करणार्‍या शहरातील कुंभारगल्लीतील तांबोळी ब्रदर्स या दुकानावर पोलिसांनी सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांंचा सुमारे 62 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

राज्यात सर्वत्र गुटखाबंदी कायदा अस्तित्वात असताना या कायद्याला न जुमानता संगमनेरात खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील रईस सरदार तांबोळी याच्या मालकीच्या तांबोळी ब्रदर्स या दुकानात गुटख्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दुपारी 2 वाजेच्या सुमारास या दुकानावर छापा टाकला.

- Advertisement -

पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता या दुकानात मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या छाप्यात 8 हजार 500 रुपयांचा 717 तंबाखू 290 पॅकेट, 4620 रुपयांचे छोटा माणिकचंद 11 बॉक्स, 8904 रुपयांचा माणिकचंद मोठा 12 बॉक्स, 10 हजाराचा हिरा गुटखा, अशा वेगवेगळ्या कंपनीचे व वेगवेगळ्या किंमतीचा एकूण 62 हजार 401 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईबाबत पुढील कार्यवाहीसाठी अन्न-औषध प्रशासन अधिकार्‍यांना कळविण्यात आले.

संगमनेरात खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असतानाही संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले होते. याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले होते. आज गुटखा दुकानदार कारवाई झाल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या