Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरात दंगल काबू प्रात्यक्षिकात विद्यार्थी जखमी

Share
संगमनेरात दंगल काबू प्रात्यक्षिकात विद्यार्थी जखमी, Latest News Sangmner Dangal Control Demo Student Injured Sangmner

अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्याने पायांना जखमा, उपचार सुरू

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- डीवायएसपी कार्यालयाच्यावतीने संगमनेरात बसस्थानकासमोर दंगल काबू प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. या प्रात्यक्षिकावेळी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्याच्या प्रात्यक्षिकात महाविद्यालयाचा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थ्यावर घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

प्रसाद अण्णासाहेब गुंजाळ (वय 18, रा. धांदरफळ, ता. संगमनेर, इयत्ता 11 वी कॉमर्स, सह्याद्री कॉलेज) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. डीवायएसपी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली काल संगमनेरात बसस्थानकासमोर दंगल नियंत्रणाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते.

या प्रात्यक्षिकासाठी नगर येथून दोेन प्रशिक्षकांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान सांयकाळी 5.15 वाजता पोेलिसांचे प्रात्यक्षिक सुरु असतांना जमावाला पांगविण्यासाठी फोडण्यात येणारे अश्रुधुराचे नळकांडे याचे प्रात्यक्षिक झाले. त्याचवेळी पोलिसांनी फेकलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या. मात्र या नळकांड्या फुटतेवेळी तेथे प्रसाद व त्याचा मित्र उभा होता.

हे नळकांडे प्रसाद याच्या पायाजवळ फुटले. त्यात तोे गंभीर जखमी झाला. ही घटना घडताच तातडीने प्रात्यक्षिक थांबविण्यात आले. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यास पोलीस व्हॉनमधून तातडीने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. सदर विद्यार्थ्याच्या दोन्ही पायांना गंभीर जखमा झाल्या असून वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याच्यावर उपचार केले. डीवायएसपी रोशन पंडीत हे देखील रुग्णालयात पोहचले. त्यांनी जखमी विद्यार्थ्याची विचारपुस केली. ग्रामीण रुग्णालयाला रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे.

संगमनेरात आयोजित केलेल्या या प्रात्यक्षिकास संगमनेर तालुका, संगमनेर शहर, घारगाव व आश्वी पोलीस ठाण्याचे मिळून एकूण 40 पोलीस कर्मचारी, डीवायएसपी रोशन पंडित, तालुका पोेलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील उपस्थित होते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!