Tuesday, April 23, 2024
Homeनगरसंगमनेरातील कत्तलखाने शोधण्याचा पोलिसांचा फार्स

संगमनेरातील कत्तलखाने शोधण्याचा पोलिसांचा फार्स

संगमनेर (शहर प्रतिनिधी)ः- शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांंसंदर्भात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यामुळे शहर पोलिसांची पळापळ सुरू झाली आहे. काही पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी काल शहरातील कत्तलखाने शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना एकही कत्तलखाना चालू अवस्थेत न आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रातील कत्तलखान्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

संगमनेरातील कत्तलखान्यात दररोज किमान 100 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होत असून हजारो किलो मांस मुंबई-ठाण्यात निर्यात केले जाते. वावी पोलिसांनी संगमनेरातून गोमांंस घेऊन जाणार्‍या वाहनांवर कारवाई करुन मांस जप्त केल्याने संगमनेरचे कत्तलखाने सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असताना शहर पोलिसांचे मात्र या कत्तलखान्यांंकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईचे कसाई संगमनेरात येवून हे मांस घेऊन जातात यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

शहरातील हिंदुत्ववादी संघटनाही आता आक्रमक झाल्या असून त्यांनी शहरातील सर्व कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे. या संघटनांच्या इशार्‍यानंतर शहर पोलीस कामाला लागले आहे. काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी काल कत्तलखान्यांंची पाहणी केली मात्र त्यांना एकही कत्तलखाना चालू असल्याचे दिसले नाही. काही कत्तलखान्यामध्ये लावण्यात आलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे बंद अवस्थेत होते. अधिकार्‍यांनी केवळ बंद कत्तलखान्याचे फोटो काढून नेल्याची माहिती मिळाली आहे.

संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनी सुरुवातीला आक्रमक काम केले. सिंघम म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते मात्र शहरातील कत्तलखान्यांंकडे त्यांचेही लक्ष गेले नाही. संगमनेर हे गोमांंस विक्रीचे मोठे केंद्र बनले असताना जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत काहीच कल्पना दिली जात नाही का? असा सवाल विचारला जात आहे

संगमनेरचे गोमांंस हे ठाणे व मुंबईला मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जाते मासांंची वाहतूक होत असताना रस्त्यावर अनेक पोलीस ठाणे लागतात वावी पोलीस वगळता इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून या मासांंची वाहतूक कशी काय होवू शकते. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे कसायांची मोठी साखळी कार्यरत असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा आहे या व्यवसायात संगमनेरातील काही राजकीय पदाधिकार्‍यांचाही सहभाग असल्याचे बोलले जाते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी संगमनेरच्या कत्तलखान्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

तर बजरंग दल कायदा हातात घेईल
आजपर्यंत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे अवैध गोवंश कत्तलखान्याच्या संदर्भात कायदेशीर मार्गानेच कारवाई करत होते पण आता कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन असतांना संगमनेरात हे अवैध कत्तलखाने चालू आहेत. यातून संगमनेरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असताना प्रशासन यावर कारवाई न करता नागरिकांच्या आरोग्याशी जर खेळत असेल तर आम्हाला कायदा हातात घेऊन संगमनेरकरांचे रक्षण करावे लागेल. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद लवकरच जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटून संगमनेरात चालणार्‍या अवैध गोवंश कत्तलखान्याची माहिती देऊन कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहे.
– कुलदीप ठाकूर, बजरंग दल, जिल्हा सह संयोजक.

- Advertisment -

ताज्या बातम्या