Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : समनापूर शिवारात अर्धवट पाय खाल्लेला अवस्थेत मृतदेह आढळला

Share
संगमनेर : सुकेवाडी शिवारात अर्धवट पाय खाल्लेला मृतदेह आढळला, Latest News Sangmner Corpse Found

संगमनेर (प्रतिनिधी)- शहरानजीक असणार्‍या समनापूर शिवारात म्हसोबा मंदिरानजीकच्या शेतात एका 60 वर्षीय इसमाचा डावा पाय अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निवृत्ती विष्णू गुंजाळ (वय 60, रा. कोल्हेवाडी रस्ता, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी समनापूरच्यापुढे असलेल्या हॉटेल पल्लवी नजीक, म्हसोबा मंदिराच्या लगत असलेल्या मक्याच्या शेतात कोल्हेवाडी रस्त्यावर राहणार्‍या निवृत्ती विष्णू गुंजाळ (वय 60) यांचा डावा पाय अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सदरची घटना समजताच शहर पोलीस व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर इसमाची दुचाकी (क्र. एमएच.17/ए. एस.1822) व चप्पल बाजूलाच आढळून आली तर दत्तात्रय आनंदा गुंजाळ यांच्या शेताच्या मक्याच्या वाफ्यात पोटावर पडलेला व त्याचा डावा पाय अज्ञात जनावराने खाऊन टाकलेला मृतदेह आढळला. त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र सदर इसमाने आत्महत्या केली की श्‍वापदाने मारले याचा उलगडा वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच होणार आहे.

याबाबत समनापूरचे पोलीस पाटील गणेश शेरमाळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 05/2020 नुसार नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. धादवड करत आहे. निवृत्ती गुंजाळ यांचे समनापूर शिवारात संतकृपा ट्रेडींग नावाने दुकान आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.

सदरच्या इसमाचा मृत्यू अज्ञात हिंस्त्र श्‍वापदाच्या हल्ल्याने झाला की बिबट्या अथवा तरसाच्या हल्ल्यात याबाबत अद्यापही कोणतीही स्पष्टता नाही, अशी माहिती वन विभागाचे वन परिक्षेत्रपाल एस. एस. माळी यांनी दिली. सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!