Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेरात कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर

Share
संगमनेरात कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर, Latest News Sangmner Containment Buffer Zone Declared

24 मे पासून 1 जूनपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर शहरातील काही भाग कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आला असून घोषित केलेल्या कन्टेन्मेंट झोन क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इ. व बफर झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री सेवा इ. दिनांक 24 मे पासून दिनांक 01 जून, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच सदर क्षेत्रातून वाहनांचे अवागमन प्रतिबंधीत करण्यात येणार आहे. संगमनेर शहरातील रहीमतनगर, उम्मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती हा भाग कन्टेन्मेंट झोन, भारतनगर, जुना जोर्वे रोड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती हा भाग बफर झोन घोषित करण्यात आला आहे. यासाठी नविन जोर्वे नाका हा प्रवेशासाठीचा मार्ग असणार आहे. याशिवाय, शहरातील ईस्लामपुरा, कुरण रोड, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा हा भागही कन्टेन्मेंट झोन तर बिलाल नगर आणि पुनर्वसन कॉलनी हा भाग बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या भागासाठी अलका फ्रुट कॉर्नर, कोल्हार-घोटी हायवे हा प्रवेशासाठीचा मार्ग असेल.

राज्य शासनाने करोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग अधिनियम 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार, हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
संगमनेर शहरातील हॉटस्पॉटची मुदत दिनांक 23 मे, 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत आहे. संगमनेर शहरातील रहीमतनगर व ईस्लामपुरा भागातील दोन व्यक्तींना करोना विषाणूची लागण झालेली असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

या क्षेत्रातून करोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील रहीमतनगर, उम्मतनगर, डोंगरे मळा, पठारे वस्ती तसेच ईस्लामपुरा, कुरण रोड, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा हे क्षेत्र कन्टेन्मेंट झोन व भारत नगर, जुना जोर्वे रोड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती, बिलाल नगर, पुनर्वसन कॉलनी हे क्षेत्र बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. दिनांक 24 मे ते दिनांक 01 जून 2020 या कालावधीत कन्टेन्मेंट झोन व बफर झोनमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे नमूद करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!