Friday, April 26, 2024
Homeनगरजनता कर्फ्यूने संगमनेर थांबले…

जनता कर्फ्यूने संगमनेर थांबले…

संगमनेर (प्रतिनिधी)- देशात कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार काल रविवारी स्वयंस्फूर्तीने संगमनेरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. शहरासह तालुक्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील गजबजलेल्या नवीन नगर रोड, नाशिक रोड, अकोले रोड, अशोक चौक, मेन रोड, नेहरू चौक, सय्यदबाबा चौक, दिल्ली नाका, विठ्ठल मंदिर चौक, तेली खुंट, घासबाजार, नगरपालिका रोड, बाजारपेठ, चावडी चौक, गांधी चौक, मंगल कार्यालय रोड, बाजार पेठ, मोमीनपुरा या शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी भयानक शांतता होती. पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड शुकशुकाट तर संगमनेर बस स्थानकावर एकही व्यक्ती दिसत नव्हता.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर पोलीस तैनात होते. चुकून एखादा नागरिक रस्त्यावर दिसला तर त्याला तात्काळ घरी जाण्याच्या सूचना पोलीस करत होते. संगमनेर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेनेही जनता कर्फ्युला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, बंद कडकडीत व्हावा, यासाठी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडित, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी काटेकोर नियोजन केले होते. नगरपालिकेने देखील संगमनेरात लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने गेल्या चार दिवसापासून संगमनेरात औषध फवारणी मोहीम हाती घेतली आहे. काल संगमनेर पूर्णतः बंद होते. त्यावेळी नगरपरिषदेचे औषध फवारणी पथक आपले काम पार पाडत होते तर स्वच्छता मोहिमेत ठिकठिकाणी कचरा उचलण्यात येत होता. रस्ते झाडून घेतले जात होते तर शहराच्या प्रत्येक उपनगरातील कॉलनीत, गल्लीत, रस्त्यावर औषध फवारणी करण्यात आली.
सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सर्वत्र गल्लोगल्ली नागरिकांनी आपापल्या घराच्या खिडकी, गॅलरीहून ताटे वाजवून, टाळ्या वाजवून प्रशासन, डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिकेचे कर्मचारी यांचे आभार मानत अभिनंदन केले.

आश्वीत जनता कर्फ्यू कडकडीत

आश्वी (वार्ताहर)- कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या जनता कर्फ्यू या संकल्पनेला संगमनेर तालुक्यातील आश्वीसह 28 गावांमधील नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांनी रविवारी शंभर टक्के बंद पाळून पाठिंबा दिला आहे.

यावेळी उंबरी-बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, प्रतापपूर, पानोडी, निमगावजाळी, ओझर, रहिमपूर, कनोली, मनोली, दाढ, चणेगाव, शेडगाव, हंगेवाडी, मालुंजे, वरंवडी, झरेकाठी, मांची, कोंची, पिपंरणे, अंभोरे, डिग्रस, खळी, खरशिंदे, शिबलापूर, कनकापूर, जोर्वे, सादतपूर, औरंगपूर, चिंचपूर आदी गावांतील नागरिक, व्यापारी व व्यावसायिक यांनी रविवारी 100 टक्के बंद पाळला. याप्रसंगी आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार तात्याराव वाघमारे, गुप्तवार्ता विभागाचे अनिल शेगाळे, हवालदार विनोद गंभिरे, संजय लाटे, भागाजी धिंदळे, आर. टी. मोरे, आर. बी. भाग्यवान, हुसेन शेख, रवींद्र ब्राम्हणे, शांताराम झोडगे, प्रसाद सोनवणे, अमर घाडगे, आनंद वाघ, व्ही. व्ही. दांडगे, संजय गायकवाड, अनिल शेळके, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे यांनी नागरिकांना घाबरू नका, सतर्क राहा, गर्दी टाळा, घरातच राहा तसेच प्रशासन व वैद्यकीय दिशानिर्देशांचे पालन करा असे आवाहन केले.

- Advertisement -

नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांची आपुलकीने विचारपूस करत चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था केली होती. तर कारण नसताना रस्त्यावर फिरणार्‍या दोन तीन तरुणांना पोलिसांनी चोपही दिला आहे. परिसरातील अत्यावश्यक सेवाही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. तर गर्दीची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेली बस स्थानके, राजहंस पॉइर्ंट, बाजरतळ, पेट्रोल पंप आदी ठिकाणे पूर्णतः बंद होती. तसेच शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी दूध संकलन केद्रेंही पहाटे सुरू करण्यात आली होती, तर सायंकाळचे संकलन हे रात्री उशीरा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

तळेगाव दिघे येथे जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव दिघे (वार्ताहर)- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे सहित परिसरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून तळेगाव दिघे चौफुलीसह रस्त्यांवर सन्नाटा दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले.

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आठवडे बाजार बंद, दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार रविवारी नागरिकांनी जनता कर्फ्यूचे पालन केले. जनता कर्फ्यूमुळे तळेगाव दिघे चौफुली परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. दक्षता म्हणून नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व अधिकवेळ घरातच थांबावे, असे आवाहन तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या