Wednesday, April 24, 2024
Homeनगरसंगमनेर : 32 पैकी 28 व्यक्ती निगेटिव्ह

संगमनेर : 32 पैकी 28 व्यक्ती निगेटिव्ह

चौघांच्या अहवालाची प्रतिक्षा

संगमनेर (प्रतिनिधी) : संगमनेरात तीन कोरोना बाधीत आढळून आल्यावर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काल दुसर्‍या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. संगमनेरातून पाठविलेल्या 32 पैकी 28 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले असून सर्व निगेटिव्ह आहेत. या सर्वांना संस्थात्मक अलगिकरण कक्ष येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. वृंदावन हॉस्पीटल साकुर फाटा व सिद्धकला हॉस्पीटल संगमनेर खुर्द येथे सदर व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. उर्वरीत 4 व्यक्तींचे अहवाल अप्राप्त आहेत, अशी माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

- Advertisement -

संगमनेरात सील करण्यात आलेल्या भागातील नागरीकांची तपासणी सुरुच आहे. 13 हजार 227 लोकसंख्या असल्याने 13 पथकांच्या माध्यमातून ही तपासणी होत आहे. अद्याप या तपासणीत कुणी बाधीत आढळून आलेले नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. दरम्यान संगमनेरात ज्या भागात कोरोना बाधीत व्यक्ती आढळून आले त्या भागासाठी ‘क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना’ राबविण्यात येत आहे.

असे केले जाते सर्वेक्षण
कंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. त्यातील घरांची संख्या त्याची लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. त्यांना विभाग वाटून दिला जातो. सकाळी 8 ते सायंकाळी 4 यावेळात सर्वेक्षणाचे काम केले जात असून पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतली जाते. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकार्‍याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकाने पुढील 14 दिवस दररोज सर्वेक्षण करायचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो.

पथकातील सदस्य
या पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सींग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो. या पथकामार्फत सर्वेक्षणा सोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्वपूर्ण कामही केले जाते. शिवाय कोरोनाबाबत जनप्रबोधनचेही काम केले जाते.

असा आहे कंटेनमेंट आराखडा
ज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे ‘क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना’ राबविली जात आहे. त्यानुसार बाधीत रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलो मीटर पर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जावून लोकांचे सर्वेक्षण केले जाते. सध्या राज्यात ज्या भागात एक रुग्ण जरी बाधीत आढळून आला तरी देखील सर्वेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या