Type to search

साईज्योती’ मध्ये चार दिवसांत 1 कोटी 60 लाखांची उलाढाल

Share
साईज्योती’ मध्ये चार दिवसांत 1 कोटी 60 लाखांची उलाढाल, Latest News Saijyoti Bachat Gat Exhibition Turnover Ahmednagar

रविवार हाऊसफुल्ल : आज हळदी-कुंकू समारंभाने समारोप

अहमदनगर (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आयोजित साईज्योतील महिला बचत गट प्रदर्शन रविवारी दिवसभर हाऊसफुल्ल होते. रविवारी सुट्टी असल्याने नगकरांनी दिवसभर या ठिकाणी खरेदीचा आनंद घेत, त्यानंतर प्रदर्शनातील खाऊगल्लीत विविध खाद्य पदार्थावर ताव मारला. प्रदर्शनाच्या चार दिवसात महिला बचत गटांचे 1 कोटी 60 लाख रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आयोजकांकडून वर्तविण्यात आला. आज हळदी कुंकाच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे.

राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नगरमध्ये गुरूवारपासून साईज्योती स्वयंसाहायता यात्राजिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात 300 स्वयंसमूहांनी या सहभाग घेत विविध कलाकृती, खाद्यपदार्थ बनवून विक्रीसाठी ठेवले आहेत. या शहरातील खवय्यानी भरभरून प्रतिसाद दिला असून कडाक्याच्या थंडीत चुलीवरील मांडे, वांग भरीत भाकरी, थालीपीठ, शिपीआमटी, शिरखुरमा, पाणीपुरी, पावभाजी असे विविध खाद्यपदार्थांची चव या यात्रेत चाखायला मिळत असल्यामुळे खवय्यांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे.

काल रविवार सुट्टीचे औचित्य साधत या खाऊगल्लीला नगरकरांनी अफाट प्रतिसाद दिला. प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशीच जवळपास 1 कोटी 59 लाख 40 हजार 462 रुपये रुपये एवढी मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी झाली आहे.

या यात्रेत हातसंडीचे तांदूळ, सेंद्रिय हळद, गव्हाच्या पिठापासून बनवलेले विविध पदार्थ, पेढे, गुलाब अगरबत्ती असे असंख्य वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे महिलांचा देखील या यात्रेला प्रतिसाद वाढत आहे. बेरोजगार मुला, मुलींसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून रोजगार संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

त्या मेळाव्यात विभागीय सेल एक्झिक्युटिव्ह अधिकारी अनिता कुलकर्णी यांनी उपस्थित बेरोजगार विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कोर्सची माहिती दिली. तसेच या योजनेअंतर्गत वॉलसन सर्व्हिस लिमिटेड औरंगाबाद, कारडा इन्स्टिट्यूट नाशिक, इम्पॉवर प्रगती-पुणे, सिपेट-औरंगाबाद या संस्थांनी सहभाग घेऊन आलेल्या कोर्सेसची माहिती दिली.

मान्यवरांच्या भेटी
शनिवारी रात्री खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रदर्शनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. खा. डॉ. विखे यांच्या अचानक भेटीमुळे अधिकार्‍यांची चांगलीच धावधाव झाली. रविवारी दुपारी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी या ठिकाणी भेट दिली. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी रविवारी रात्री सात वाजता भेट दिली. प्रदर्शनातील अनेक महिलांसोबत त्यांनी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. शालीनीताई विखे यांच्या कार्यकाळात बचत गटांच्या मालाचे साईज्योती असे नाव देण्यात आलेले आहे.

प्रदर्शनात कोपरगाव तालुक्यातील साईसाक्षी बचत गटाने 7 क्विंटल हळदीची पावड विक्रीसाठी उपलब्ध केली होती. यातील बहूतांशी हळदीची विक्री झाली असून त्याच सोबत 4 क्किंटल ओली आणि सुकी हळदीची विक्री झाली असून सर्व प्रकारातील मिर्ची या ठिकाणी भाव खातांना दिसली. राहुरी खुर्द येथील विविध प्रकारातील पापड विक्रीसाठी आणले होते. यात पालक, मेथी, लसून पापड आणि पोंगे विक्रीसाठी उपलब्ध होते. या गटाला चांगला प्रतिसाद मिळाला. अकोल्यातील राजूरच्या ओम बचत गटाच्या विविध मसाल्यांना मोठी मागणी होती. या ठिकाणी नगरकांच्या उड्या पाहला मिळाल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!