Thursday, April 25, 2024
Homeनगरसाईबाबा रुग्णालयात क्वारंटाईन रुग्ण जीआयसीयुत

साईबाबा रुग्णालयात क्वारंटाईन रुग्ण जीआयसीयुत

इतर रुग्णांमध्ये भितीचे वातावरण

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून रुग्णांची संख्या वाढत चालली झाली आहे. या साथीच्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी तसेच आटोक्यात आणण्यासाठी राज्यशासन विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना स्वतंत्र कक्षात किंवा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.

- Advertisement -

मात्र साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या कोपरगाव तालुक्यातील एका रुग्णाला शनिवारी जीआयसीयूमध्ये उपचारार्थ भरती केल्याने याठिकाणी असलेल्या रुग्णांमध्ये तसेच कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याविषयी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न येथील प्रत्येक कामगारांना पडला आहे. सदर व्यक्तींची करोना टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी 22 मेपर्यंत क्वारंटाईनची मुदत असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दि.8 मे रोजी कोपरगाव तालुक्यातील एका क्वारंटाईनचा शिक्का मारलेल्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर व्यक्ती सध्या 11 बेडची क्षमता असलेल्या जीआयसीयु कक्षात उपचार घेत असून क्वारंटाईनचा शिक्का असल्याने या ठिकाणच्या रुग्णांमध्ये तसेच कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदरील व्यक्तींची नगर येथील शासकीय रुग्णालयात करोना टेस्ट करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे. मात्र 22 मेपर्यंत क्वारंटाईन ठेवण्यात आले असल्याचे या व्यक्तीच्या नातेवाईक मंडळींनी सांगितले. असे असले तरी देखील क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीसोबत इतर रुग्णांना ठेवण्यात येते का? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. रुग्णालय प्रशासनाने सदर व्यक्तीबाबत कामगार तसेच जीआयसीयु कक्षातील रुग्णांना जनजागृती करून प्रबोधन करणे गरजेचे आहे. रुग्णालयात एन 95 मास्क आम्हाला मिळत नसल्याचे कामगारांनी सांगितले.

राज्यातील रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातून साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होत आहेत. जिल्हाबंदी असताना याठिकाणी रुग्ण येत असून रुग्णांची खातरजमा न करता प्रवेश दिला जात आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीला स्वतंत्र कक्षात ठेवावे. जेणेकरून येथील रुग्णांना आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही.
– गणेश गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शिर्डी

क्वारंटाईन केलेला व्यक्तीला रुग्णालयात इतर रुग्णांबरोबर ठेवता येते याबाबतची चौकशी सिव्हिल सर्जन यांच्याकडे केली असून चर्चेअंती रुग्णालय प्रशासनाने पाऊल उचलले आहे. सदर रुग्णाची टेस्ट निगेटिव्ह असल्याने त्यास स्वतंत्र कक्षात ठेवले नाही. रुग्णालयात पीपीई किट तसेच एन 95 मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सर्वांना वापरण्यास सक्ती केली आहे. तसे वरिष्ठ पातळीवरून आदेश असल्याने आम्ही प्रत्येकाला मास्क देत आहोत.
– डॉ. प्रितम वाडगांवे, वैद्यकीय उपसंचालक, साईबाबा सूपर रुग्णालय शिर्डीं.

- Advertisment -

ताज्या बातम्या