साई मंदिर बंद झाल्यामुळे चक्क दुकाने बंद करावी लागली; अर्थव्यवस्था विस्कळीत

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक असल्याने त्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून शिर्डीचे साईमंदिर बंद करण्यात आले असल्याने भाविकांची संख्या शून्य झाली आहे. त्यामुळे शहरात शुकशुकाट निर्माण झाला असून दुकाने चक्क बंद करण्यात आली आहे. एकंदरीतच एकिकडे कोरोनाच्या बचावासाठी साईमंदिरासह दुकाने बंद करण्याची वेळ आली तर दुसरीकडे शिर्डीची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आहे. त्याअनुषंगाने शासन स्तरावर खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. देशात नंबर दोनचे सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून नावारूपास आलेले साईबाबांचे मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे साईबाबांच्या भाविकांवर अवलंबून असलेली शिर्डी शहराची अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडून गेली आहे. मार्च एंडमुळे अनेकांच्या गळ्याला बँका, फायनान्स, खाजगी सावरकर यांचा फास लागला आहे.

अशातच या कोरोना आजाराने डोके काढल्याने दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांची मोठी डोकेदुखी झाली आहे. साई मंदिर बंद राहिल्यामुळे कधी नव्हे तो शिर्डी शहर आणि मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवत आहे. व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद ठेवली आहेत. 31 मार्चपर्यंत जर मंदिर बंद ठेवण्यात आले तर उपासमारीची वेळ उद्भवेल असेही दुकानदारांनी बोलून दाखवले. कोरोनाची कुर्‍हाड शिर्डीच्या अर्थकारणावर कोसळल्याचं चित्र आहे. देऊळ बंद ठेवण्याच्या निर्णयाचं ग्रामस्थांनीही स्वागत केलं आहे. रस्त्यावरही शांतता आहे. साई मंदिर बंद असले तरी धार्मिक पूजा-अर्चा नेहमीप्रमाणे सुरु असणार आहे.