Wednesday, May 8, 2024
Homeनगर3 दिवसांत शिर्डीत सुमारे 4 लाख भाविक साईचरणी नतमस्तक

3 दिवसांत शिर्डीत सुमारे 4 लाख भाविक साईचरणी नतमस्तक

भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी, दर्शन रांगेत चहा व बिस्कीटांची मोफत व्यवस्था

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला सबका मालिक एक संदेश देणार्‍या शिर्डीत नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे साडेतीन ते चार लाख भाविकांनी साईचरणी नतमस्तक होऊन समाधीचे दर्शन घेतले. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला जगभरातील भाविक मोठ्या प्रमाणावर साई दरबारी हजेरी लावून नववर्षासाठी प्रार्थना करतात.

- Advertisement -

मागील दहा वर्षांपासून शिर्डीत 31 डिसेंबरला भाविकांचे हजेरीचे प्रमाण वाढत आहे. जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणार्‍या साईबाबांची महती देश-विदेशात पोहोचली आहे. दि. 31 डिसेंबर ते 2 जानेवारी या तीन दिवसांत सुमारे साडेतीन ते चार लाख भाविकांनी हजेरी लावली. यामध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी सशुल्क दर्शन पासेसच्या माध्यमातून 11 हजार 480 तसेच बायोमेट्रीक दर्शन पास 63 हजार 334 तर ऑनलाईन दर्शन पासच्या 3 हजार 955 असे एकूण 78 हजार 769 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दि. 1 जानेवारी रोजी सशुल्क दर्शन पासच्या माध्यमातून 20 हजार 150, बायोमेट्रिक दर्शन पासेसच्या 64 हजार 63 तर ऑनलाईन दर्शन पासच्या 4 हजार 9 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

असे एकूण 88 हजार 222 व दि. 2 जानेवारी रोजी सशुल्क पास दर्शनाद्वारे 8 हजार 224, बायोमेट्रिक दर्शन 66 हजार, ऑनलाईन दर्शन पास 4 हजार 203 असे एकूण तिसर्‍या दिवशी 79 हजारांपेक्षा जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. या तीन दिवसांत लहान मुलांसह तसेच गावकरी गेटवरून जाणार्‍या एकूण सुमारे साडेतीन ते चार लाखांपेक्षा जास्त भाविकांनी साईदरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. या तीन दिवसांत साईबाबा संस्थानच्यावतीने सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक ठेवण्यात आली.

किरकोळ अपवाद वगळता सर्व भाविकांना साईबाबांचे सोयीस्कररित्या दर्शन घेता यावे यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सुरक्षा व्यवस्थेचे योग्य नियोजन केले आहे. तसेच साई मंदिर परिसरात भाविकांना शुद्ध पिण्याचे पाणी तसेच दर्शन रांगेत चहा बिस्किटे यांची मोफत व्यवस्था करण्यात आली. सशुल्क दर्शन पाससाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढल्याने थोड्या कालावधीसाठी सशुल्क दर्शन पास व्यवस्था बंद करण्यात आली होती, मात्र पुन्हा ती पूर्ववत करण्यात आली. आज तिसर्‍या दिवशी सुद्धा शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून पुढील दोन दिवसांत अशीच गर्दी राहणार आहे.

पोलिसांनी शिर्डी शहरात गर्दीचे योग्य नियोजन केले. यामध्ये शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे व त्यांच्या सहकार्‍यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवून स्वतः बारकाईने लक्ष वेधले आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतीने पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगर-मनमाड महामार्गावरील लक्ष्मीनगर ते रत्नाकर बँक चौक या दरम्यान छोट्या वाहनांना प्रवेश बंदी केली. त्यामुळे भाविकांना रस्त्याने पायी जाणे सोपे झाले. वाहतूक कोंडी झाली नाही. एकंदरितच शिर्डी शहरात 31 डिसेंबरच्या पूर्वसंधेला व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून भाविकांची मांदियाळी दिसून आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या