Friday, April 26, 2024
Homeनगरसाईआश्रम विलगीकरण कक्षातील वापरलेले हँडक्लोज रस्त्यावर आढळले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

साईआश्रम विलगीकरण कक्षातील वापरलेले हँडक्लोज रस्त्यावर आढळले; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिर्डी (शहर प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील लोणी येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना क्कारंटाईनसाठी शिर्डी येथील साईआश्रम फेज 2 मध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. याठिकाणी वापरून फेकून दिलेले हॅन्ड ग्लोज बाजूला असलेल्या रस्त्यावर आढळून आल्याने आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील स्वच्छता वाढविणे गरजेचे असतांना अशा प्रकारचे कृत्य करून रोगाला आमंत्रण देण्यात येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या निमगाव येथील साईआश्रम फेज 2 मध्ये राहाता तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील सुमारे 53 व्यक्तींना चौदा दिवसासाठी क्कारंटाईन करण्यात आले आहे. याठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या लोकांसाठी पोलीस सुरक्षा तसेच स्वच्छता कमकुवत पडत असल्याने येथील रस्त्यावर वापरण्यात आलेले हॅन्ड ग्लोज फेकून दिलेल्या परिस्थितीत मिळून आले. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विलगीकरण कक्षापासून अवघ्या शंभर मिटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर रहिवाशांची वसाहत आहे.

- Advertisement -

सदरील घटनेपासून येथील नागरिक भयभीत झाले असून या परिसरात साईबाबा संस्थानच्या वतीने तातडीने जंतुनाशक फवारणी करून सदरचा परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे. दोन दिवसापूर्वी विलगीकरण कक्षात एकाने वेडसरपणा करून निगराणी करत असलेल्या यंत्रणेला त्रास दिला होता. मात्र त्याची रवानगी नगरला करण्यात आली आहे.

त्यानंतर रस्त्यावर अशाप्रकारे वापरलेले हॅन्ड ग्लोज कोणी टाकले, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा खोडसाळपणा येथील नागरिकांच्या जिवावर बेतू शकतो. दरम्यान येथील स्वच्छता कर्मचार्‍यांना देखील खबरदारीच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकंदरीतच सदरील व्यक्ती क्वारंटाईन असून त्यांना चौदा दिवसासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले तरी सुद्धा आसपासच्या नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या