रेशनचा तांदुळ काळ्या बाजारात

jalgaon-digital
2 Min Read

चौघांविरूध्द गुन्हा । आरोपी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यातील संवत्सर शिवारातील एका खाजगी गोडावूनमध्ये साठवणूक केलेला रेशन दुकानातील 41 गोण्या तांदुळ काळ्या बाजारात विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी रेशन दुकानदारांसह चौघांवर तहसिलदार योगेश चंद्रे यांनी गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत 41 गोण्या तांदुळ जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. विषेश म्हणजे काळाबाजार करणारा रेशन दुकानदार कोपरगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक सचिन अशोकराव बिन्नड यांच्या फिर्यादीवरून तांदुळ खरेदी केलेला विनोद पंडीत दुकळे रा. हनुमाननगर, कोपरगाव, गाळा मालक चंद्रशेखर त्रिंबक जाधव रा, येवला रोड कोपरगाव, रेशन दुकानदार कैलास दादासाहेब बोरावके रा. बैलबाजार रोड कोपरगाव, चालक अन्वर आजम शेख रा. लक्ष्मीनगर कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली आहे. संबधीत रेशन दुकानदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

कोरोना सारख्या भयानक संकटामध्ये केंद्र व राज्यशासन, इतर स्वयंसेवी संस्था सर्वसामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी रेशनद्वारे धान्य कसे पोहचेल असा प्रयत्न करत असताना गोरगरिबांच्या हक्काचे रेशनवर येणार्‍या मालाचा जर कोणी काळा बाजार करत असतील तर त्याच्या विरुद्ध कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे. रेशन दुकानदारांनी मानवतेचा विचार करून गोरगरिबांचा दुवा घ्यावा व गैरप्रकार करू नये.
– नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोरोना सारख्या विश्वव्यापी संकट भारत देशावर व महाराष्ट्रावर घोंगावत असताना सर्वसामान्य नागरिकांचे रेशनवरील धान्याचा काळा बाजार करणार्‍यांवर अत्यावश्यक वस्तु अधिनियम यातील अधिक कलमाद्वारे गुन्हे दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी.जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांचा हक्काच्या धान्याचा काळा बाजार कोणी करणार नाही.
– संजय काळे सामाजिक कार्यकर्ते

तहसीलदार यांनी टाकलेल्या धाडीत रेशनचे काळ्या बाजारात जाणार्‍या तांदुळाच्या अवैध गोडावून छाप्यात 250 गोणी असल्याची चर्चा कोपरगाव शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये होती. मात्र गुन्हा दाखल होतांना त्यात 41 गोण्या असल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. हे रॅकेट मोठे असून अनेक गोण्या गायब असल्याची चर्चा आहे. याबाबत तालुका पुरवठा अधिकारी सचिन बिन्नोर यांना विचारले असता त्यांनी फोनवरून माहिती देण्यास नकार दिला. याबाबत मोठा संशय कल्लोळ निर्माण होत आहे. तरी या घटनेत जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *