Thursday, April 25, 2024
Homeनगरकाळाबाजार करणार्‍या सात रेशन दुकानांवर कारवाई

काळाबाजार करणार्‍या सात रेशन दुकानांवर कारवाई

पुरवठा विभागातील 9 जणांविरोधात गुन्हे दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी)– करोना लॉकडाऊनच्या काळात स्वस्त धान्य दुकानदारांनी काळाबाजार केल्याचे समोर आल्याने पुरवठा विभागाने जिल्ह्यातील 7 दुकानांवर कारवाई केली आहे. यात 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर काहींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे साथीच्या काळात स्वस्त धान्य दुकानदार काळा बाजार करत असल्याचे सिध्द झाले आहे.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात स्वस्त धान्य वितरणाचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यासाठी मंजूरीनुसार गहू, तांदूळ आदी अन्नधान्य पोहोच केले आहे. परंतु यातही काही दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याच्या, तसेच काही ठिकाणी दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे पुरवठा विाागाने पथकांमार्फत तपासणी करून दुकानांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 दुकानांवर कारवाई करण्यात आली असून 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोघांना अटकही करण्यात आली आहे. काहींना दंडात्मक कारवाई, तर काहींचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तात्पुरती सोय म्हणून ही दुकाने इतर दुकानांना जोडण्यात आले आहेत.

11 हजारांचा मुद्देमाल जप्त
या कारवाई दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाने कोपरगावमध्ये 6 हजार 540 रुपयांचा तर पाथर्डी तालुक्यात 4 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासह संगमनेर तालुक्यात दोन ठिकाणी स्वतंत्रपणे एक हजार रुपयांप्रमाणे दंड करण्यात आला आहे. या पुढील काळा पुरवठा विभाग स्वस्त धान्य दुकानांची पथकांमार्फत चौकशी सुरू ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

श्रीरामपूरच्या ग्रामीण भागातही तक्रारी
श्रीरामपूर तालुक्यातील अनेक भागात अद्यापही अनेकांना धान्य मिळाले नाही अशा तक्रारी आहेत. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. ज्यांच्याकडे अनेक दुकाने जोडली आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्डधाकांचे हाल हाल होत आहेत.

यांच्यावर झाली कारवाई
शिवनाथ म्हातारबा भागवत (संगमनेर), पंडित दीनदयाळ सोसायटी (संगमनेर), कैलास दादासाहेब बोरावके (कोपरगाव), कानिफ रामा आंधळे (पाथर्डी), वैशाली रवींद्र कांबळे (नगर तालुका), श्री संत भगवानबाबा (जामखेड) आणि शिल्पा पटेकर (जामखेड) यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या