राजस्थानला ट्रकमधून जाणारे 70 मजूर गुहा शिवारात पकडले

jalgaon-digital
2 Min Read

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- इचलकरंजी येथील कापड मीलमध्ये काम करणारे कुटुंबिय आपल्या लेकरांबाळासह माल वाहतूक गाडीतून जात असताना देवळाली प्रवरा- गुहा शिव परिसरात स्वयंसेवकांनी पकडले. दरम्यान, ही घटना समजताच पोलिसांनी संबंधित वाहनचालक व मालकावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यांचा प्रवास अर्ध्यावरच अडवून त्यांचा मुक्काम सध्या राहुरी फॅक्टरीवरच ठेवण्यात आला असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. परंतु इचलकरंजी येथून सुमारे 70 जणांनी राजस्थान येथे जाणार्‍या मालवाहतूक वाहनांमध्ये बसून गावाकडे जाण्यास आगेकूच केली होती.

दरम्यान, देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनात अनेक स्वयंसेवक प्रशासनाच्या कामकाजात हातभार लावत आहेत. त्यांनी देवळाली प्रवरा शहरात विविध भागात चेकपोस्ट सुरू केली आहेत. गणेगाव रोड चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना स्वयंसेवकांना खाद्य घेऊन जात असलेल्या माल वाहतूक गाडीमध्ये काही लहान मुले दिसली. स्वयंसेवकांनी पाहणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये 60 ते 70 जण खाद्यामध्ये लपून बसलेले होते.

त्यांच्यावर ताडपत्रीचे आवरण टाकलेले होते. स्वयंसेवकांनी तात्काळ नगराध्यक्ष कदम यांच्याशी संपर्क साधला. नगराध्यक्ष कदम यांनी सर्वांना एका शाळेत नेत तहसीलदार व पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन बागूल, पोलीस हवालदार शिरसाठ, होमगार्ड प्रमुख अनिल कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर गाडीमध्ये सापडलेल्या सर्व परप्रांतीय नागरिकांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवण्यात आले आहे. इचलकरंजी येथील कापड मील कारखान्यातून संबंधित कामगारांनी राहुरीपर्यंत प्रवास केल्याचे पाहून प्रशासनही चक्रावले आहे.

राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. माल वाहतूक करणार्‍यांनी परप्रांतीय नागरिकांना घेऊन प्रवास करीत मोठी चूक केली. दरम्यान, संबंधित परप्रांतीय कामगारांना राहुरी फॅक्टरी येथील शाळेमध्ये ठेवावे लागणार आहे. लॉकडाऊनच्या काळापर्यंत त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासन व स्वयंसेवी संस्थांकडून केली जाईल, अशी माहिती तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *