Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अवकाळी पावसामुळे नगर तालुक्यात नुकसान

Share
अवकाळी पावसामुळे नगर तालुक्यात नुकसान, Latest News Rain Taluka Loss Administration Ignore Ahmednagar

जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष : वादळी वार्‍यामुळे संत्रा, गहू, मका भुईसपाट

अहमदनगर (वार्ताहर)- रविवारी रात्री 8 च्या सुमारास नगर तालुक्यातील खडकी, चिचोंडी परिसराला वादळी वार्‍यासह किरकोळ पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खडकी येथे वार्‍याचा वेग जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात तोडणीला आलेला संत्रा गळाला. 150 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील संत्रा बागांना फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान महसूल विभागाने गारपिठ आणि अवकाळी पावसातून नगर तालुका वगळा असल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे.

खडकी सह, बाबुर्डी बेंद, खंडाळा, धोंडेवाडी, जाधववाडी या भागात संत्रा फळबागांचे प्रमाण मोठे आहे.एकट्या खडकीमध्ये 100 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर संत्रा फळबागा लागवड आहे.मागील वर्षी 2018-19 च्या कडक दुष्काळातही टँकरने पाणी घालून कसे बसे फळबागा जगवल्या आहेत. 2091 च्या पावसाळ्यात ही या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही.

तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असताना येथील शेतकरी आजही फळबागांना टँकरने पाणी घालत आहेत. त्यासाठी एकरी दीड ते दोन लाख खर्च केला आहे. फळबागां विक्रीला आलेल्या आहेत. त्यातच रविवारी रात्री 8 च्या सुमारास जोरावर वारा सुरू झाला. पाऊस नसला तरी वारा जोराचा होता. त्यात मोठ्या प्रमाणात फळे गळाले. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर चिचोंडी परिसरात काढणीला आलेला कांदा, हरभरा, गहू ज्वारी तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परिसरातील गहू भुईसपाट झाला तर हरभरा,कांदा पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी खळ्यातील ज्वारीची कणसे भिजले आहेत. तसेच ज्वारीचा कडबाही भिजल्याने तो काळा पडण्याची शक्यता आहे. यामुळे मुक्या जित्राबांना आता उन्हाळ्यात काय खाऊ घालायचे असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला असून आधीच दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकर्‍यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

मागील वर्षीचे पंचनामे नाहीत
2019 ला ही खडकी गावाला, वादळी वार्‍याचा तडाखा बसला होता.त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. येथील शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदन दिले होते. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय समोर आंदोलन केले पण पंचनामे झाले नाहीत आणि नुकसान भरपाई पण मिळाली नाही.

पुन्हा कर्जाचा बोजा होणार
आमच्याकडे अपुरा पाऊस आहे. टँकरने पाणी घालून बागा जगवल्या आहेत. लाखो रुपये पाण्यावर खर्च झाला आहे आणि त्यात या सोसाट्याच्या वार्‍याने मोट्या प्रमाणात फळे गळाली. खूप मोठे नुकसान आले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. मागील वर्षीही नुकसान झाले पण पंचनामे झाले नाहीत आणि मदत मिळावी नाही. आता जर नुकसान भरपाई मिळाली नाही पुन्हा कर्ज घ्यावे लागेल.
– प्रकाश निकम, खडकी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!