Friday, April 26, 2024
Homeनगरयावर्षी सरासरीपेक्षा जादा पाऊस

यावर्षी सरासरीपेक्षा जादा पाऊस

कावळ्याच्या घरट्याच्या बांधणीवरून ज्येष्ठ शेतकर्‍यांनी मांडला अंदाज

माहेगाव (वार्ताहर)- यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज ग्रामीण भागातील जुन्या-जाणत्या वयोवृद्धांनी व्यक्त केला आहे. झाडावरील कावळ्याने बनविलेल्या घरट्याच्या उंचीवरून त्यांनी हा अंदाज बांधला असून त्यांचा हा पारंपरिक ठोकताळा अगदी अचूक ठरल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisement -

प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत निसर्ग माणसाला देत असतो. परंतु ते बघण्याची नजर माणसांकडे असायला हवी. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टींवर व घडामोडींवर जुने लोक नजर ठेवत असत. जुन्या काळी विज्ञान एवढे प्रगत नसताना पावसाचा अचूक अंदाज शेतकरी लावत असे. तसाच एक अंदाज यंदा किती पाऊस होईल? हे कावळ्याने बांधलेल्या घरट्यावरून खुडसरगाव येथील एका ज्येष्ठ वयोवृद्धाने सांगितला. कावळ्याने जर आपले घरटे झाडाच्या शेंड्यावर बनविले तर भरपूर पाऊस होणार, जर घरटे झाडाच्या मध्यावर बनविले तर सरासरीत फारच कमी पाऊस होणार आणि कुठेच घरटे आढळले नाही तर हे दुष्काळाचे संकेत असतात. अशी माहिती एका अनुभवी ज्येष्ठांनी दिली.

पावसाला सुरूवात केव्हा होईल? हे नक्की सांगता येत नाही. पण प्रतिवर्षाच्या सरासरीपेक्षा यंदा जास्त पाऊस होण्याचे संकेत दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात दुष्काळ पडणार असेल त्या भागातील सर्व पक्षी पर्जन्यछायेच्या पट्ट्यात मे मध्येच निघून जातात. अशा अनेक गोष्टी निसर्ग सांगत असतो. फक्त आपले निरीक्षण बारीक असले पाहिजे. शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीची मशागत मे मध्येच करून ठेवावी, म्हणजे पहिला पाऊस झाल्यानंतर खरिपाची पेरणी करता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

निसर्ग प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत देत असतो. विज्ञानाबरोबरच निसर्गाचे निरीक्षण करण्याची क्षमता माणसात असेल तर खूप चांगल्या-वाईट गोष्टींचा माणूस अंदाज लावू शकतो. आपले विज्ञान एवढे पुढे गेले तरी या प्रदूषणामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यासाठी आपले निसर्गाबद्दल बारीक निरीक्षण असायला हवे, असे आवाहनही या ज्येष्ठांनी केले आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असल्याप्रमाणे अंधश्रद्धावाले लगेच शंका घेतात. म्हणून या गोष्टी मागे पडत चालल्या आहेत. परंतु निसर्गाचे निरीक्षण ही मोठी जमेची बाजू आहे. हे नक्कीच सत्य आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या