Friday, April 26, 2024
Homeब्लॉगरेल्वे ‘खासगी रूळावर’..

रेल्वे ‘खासगी रूळावर’..

केंद्र सरकारला रेल्वेचे आधुनिकीकरण करायचे आहे, मात्र त्यासाठी पुरेसा पैसा नाही. त्यामुळे सार्वजनिक आणि खासगी भागिदारी (पीपीपी)च्या आधारे रेल्वेचा कायापालट करण्याचा विचार केला जात आहे. रेल्वेच्या देखभालीचा खर्च वाढत चालला असून उत्पन्नातील बराच भाग हा कर्मचार्‍यांच्या वेतन आणि भत्यावर जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. त्यामुळे काही गाड्या भागिदारी तत्त्वावर देण्याबाबत विचार करण्यात आला. त्यानुसार अर्थ मंत्रालयाच्या सार्वजनिक आणि खासगी भागिदारी मूल्यांकन समितीने दीडशे रेल्वेंना खासगी कंपनीकडे सोपवण्याला तात्विक मंजूरी दिली.

या योजनेनुसार देशभरातील शंभर मार्गावरुन खासगी तत्त्वावर रेल्वे चालवण्यात येणार आहेत. याशिवाय देशभरातील पन्नास स्थानके देखील खासगी कंपन्याला सोपविले जाणार आहेत. परंतु नवीन व्यवस्था अंगिकारल्याने रेल्वेतील कर्मचार्‍यांच्या नोकर्‍यांचे काय होणार हा एक प्रश्न आहे. खासगी कंपन्यांच्या आगमनामुळे त्यांची नोकरी टिकणार काय? नवीन नियुक्त्या होणार काय? खासगीकरणामुळे रेल्वेचे भाडे वाढणार काय? असे अनेक प्रश्न येत आहेत. या प्रश्नाबाबत रेल्वेकडून ठोस उत्तर दिले गेले नाही. दुसरीकडे खासगी कंपन्या फायदा मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे शुल्क आकारत असतात.

- Advertisement -

त्याचा बोजा प्रवाशांवर पडणार आहे. सध्या खासगी कंपनीकडून तेजस एक्स्प्रेस चालवण्यात येत असून त्याचे देशभरातून कौतुक होत आहे. परंतु त्याचे भाडे जादा आहे. ही देशातील पहिली खासगी रेल्वे आहे. आजघडीला देशातील सुमारे दीड कोटी नागरिक दररोज रेल्वेतून प्रवास करतात. अर्थात प्रत्येक जण जादा भाडे देण्याच्या मनस्थितीत नसते. याउलट रेल्वे विभागाने सामान्य प्रवाशासाठी डबे वाढविणे गरजेचेअसताना त्याचा कधीही विचार केला नाही.

मात्र रेल्वेला आपल्या विकासावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. त्याचवेळी गेल्या अनेक वर्षापासून देशातील 400 रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाचे स्थानक करण्याची योजना अंमलात आणण्याचा विचार केला जात आहे, मात्र पैसा नसल्याने या कल्पना वास्तवात उतरु शकल्या नाहीत. शेवटी केंद्र सरकारने दीडशे प्रवासी गाड्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेण्याची ही काही पहिली वेळ नाही. रेल्वेचे राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी जीआयपी (ग्रँड इंडियन पेनीनसुला) आणि बीएनआर (बंगाल नागपूर रेल्वे) या खासगी कंपन्या रेल्वेचे वहन करायच्या. मात्र तेव्हाच्या स्थितीत आणि आजच्या स्थितीत बराच फरक आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.

- Advertisment -

ताज्या बातम्या