Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरीतील जि.प.च्या 247 शाळेतील 12 हजार 772 विद्यार्थ्यांचा ऑनलाईन ‘स्टडी’

राहुरीतील जि.प.च्या 247 शाळेतील 12 हजार 772 विद्यार्थ्यांचा ऑनलाईन ‘स्टडी’

तालुक्यात ‘लर्निंग फ्रॉम होम’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ; शिक्षकांनी केला सोशल मीडियाचा प्रभावी वापर; 585 दिव्यांग विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन धडे

राहुरी (प्रतिनिधी)- करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये, नगरपालिकेच्या शाळा तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी ‘लर्निंग फ्रॉम होम’ उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करीत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, व्हॉटस्अ‍ॅपचा उपयोग करून राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 247 प्राथमिक शाळांतील 12 हजार 772 विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाचा लाभ घेत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन लिंकचा उपयोग सुरू आहे. या लिंकद्वारे आजपर्यंत 1 हजार 266 विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे.

लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तालुक्यातील शिक्षकांनी सोशल मीडियात लोकप्रिय असलेल्या व्हॉटस्अ‍ॅप या अ‍ॅपचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ठेवले आहे. शिक्षक अ‍ॅपवरून विद्यार्थ्यांना अभ्यास देतात. विद्यार्थी घरी राहूनच अभ्यास करतात व अ‍ॅपद्वारेच शिक्षकांना प्रतिसाद देतात. शिक्षकही अ‍ॅपद्वारेच विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये ऑनलाईन लिंक, ऑनलाईन प्रश्नमंजुषा, दिक्षा अ‍ॅप, शब्दकोडे, चित्रकोडे, गोष्टी, अवांतर वाचन, चित्र रंगवा, सामान्यज्ञान चाचणी, गार्डन ऑफ वर्डस्, बोधकथा आदी बाबींचा समावेश केला जातो. पुढील शैक्षणिक वर्षाची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करण्यासाठी इयत्ता पाचवी व आठवीला शिकविणार्‍या शिक्षकांचे अ‍ॅप समूह तयार केले असून त्या समूहावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येते. ज्या पालकांना स्मार्ट फोन नाहीत, अशा पालकांना फोन करून त्यांना अभ्यास सांगितला जातो. या ऑनलाइन अभ्यासासाठी गटसाधन केंद्रातील विषयतज्ज्ञ संतोष गुलदगड, श्रीराम उजगरे, सतीश तांदळे, आदी परिश्रम घेत आहेत.

या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक रमाकांत काटमोरे, पंचायत समितीच्या सभापती बेबीताई सोडनर, उपसभापती प्रदीप पवार, गटविकास अधिकारी गोविंद खामकर व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी सांगितले.

दिव्यांग विद्यार्थ्यांचाही सहभाग
राहुरी तालुक्यातील 585 दिव्यांग विद्यार्थीही ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेत आहेत. दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकारानुसार गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, किशोर खेमनर, मनोज भापकर, सारिका सांगळे, नवनाथ चेमटे, सुवर्णा ठाकूर, सीमा शेलार आदी तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक फिजिओथेरपी, स्पीचथेरपी, लार्ज प्रिंट पुस्तके, याबरोबरच दिव्यांगाच्या प्रकारानुसार प्रेरणादायी व्यक्तींचे व्हिडिओ आदीद्वारे मार्गदर्शन करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या