Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात सर्वत्र अभूतपूर्व ‘लॉकडाऊन’

राहुरी तालुक्यात सर्वत्र अभूतपूर्व ‘लॉकडाऊन’

नागरिकांनी घरातच केले ‘होम क्वारंटाईन’; 5.05 वा. टाळी-थाळीचा महागजर आणि घंटानाद; मोदी-मोदींचा गजर; आदेश मोडणार्‍या आठजणांविरूद्ध गुन्हा; नगर-मनमाड महामार्ग निर्मनुष्य

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- जगभरात थैमान घालणार्‍या कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची हाक दिली. या हाकेला राहुरी तालुक्यात उदंड प्रतिसाद मिळाला. व्यापारी पेठा, संस्था, आठवडे बाजारांसह अन्य व्यवहारही काल कडकडीत बंद ठेवण्यात आले. दळणवळणही बंद झाल्याने राहुरी तालुका या जनता कर्फ्यूमध्ये अक्षरशः जागेवरच ‘स्टॉप’ झाला. सर्व जनजीवन थांबल्याने हा ऐतिहासिक बंद ठरला.
दरम्यान, एरव्ही वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहणारा नगर-मनमाड महामार्गही काल वाहनांविना सुना-सुना पडला होता.

- Advertisement -

तर अत्यंत गर्दीच्या विळख्यात सापडलेले राहुरी बसस्थानक आणि परिसरात पुरता सन्नाटा पसरला होता. एकही बस अथवा एकही प्रवासी बसस्थानकाकडे फिरकला नाही. राहुरी शहरासह तालुक्यातील थेट ग्रामीण भागातील व्यवहारही जागेवरच थांबले होते. सर्वत्र स्मशानशांतता अबाधित राहिली. तालुक्यातील रस्त्यांवर व चौकातही चिटपाखरूही फिरकले नाही. राहुरी पोलिसांनी व शासकीय अधिकार्‍यांनी तालुक्यात फिरून नागरिकांना घरीच बसून राहण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. जनता कर्फ्यूच्या टेहळणीसाठी राहुरी पोलिसांच्या पथकाने तालुक्यात सर्वत्र गस्त घातली.

तालुक्यात सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांसह व्यापारीपेठेला जनता कर्फ्यूचे वेध लागले होते. दूध व्यावसायिक, वर्तमानपत्र विक्रेते, यांच्यासह सकाळच्या अत्यावश्यक सेवा करणार्‍यांनी आपली कामे सकाळी सात वाजण्याच्या आतच उरकून घेतली. तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख, त्यांचे सहकार्‍यांनी सकाळपासूनच तालुक्यात राऊंड सुरू केला. सकाळी राहुरी बसस्थानक व शिवाजी चौक परिसरात मोकाट फिरणार्‍या आठ नागरिकांना घरी जाण्याची विनंती करूनही त्यांनी अरेरावी केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपण जे करतो, ते आपल्या देशासाठी आणि देशबांधवांसाठी करीत असल्याने हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची भावना अनेक ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य नागरिक व महिलांनी व्यक्त केली. शहरातील रूग्णालये उघडी होती.

मात्र, कोणताही रूग्ण तिकडे फिरकला नाही. त्यामुळे रूग्णालयातही शुकशुकटाच होता. अनेक नागरिकांनी घरातच बसून ‘होम क्वारंटाईन’ करताना आपआपली खासगी घरगुती कामे उरकून घेतली. शाळांना सुट्ट्या असल्याने मुलांनी टीव्ही पाहणे पसंत केले. तर अनेकांनी बर्‍याच वर्षांनंतर पुस्तकांना हात लावून वाचनाचा छंद जोपासला. तर मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपचे व्यसन जडलेल्या अनेक नेटकर्‍यांनी या संधीचे सोने करून सोशल मीडियावर राहण्याचा विक्रम मोडला. व्यापारी, कामगार, महिला, विद्यार्थी यांनी जनता कर्फ्यूत सहभाग घेण्याबरोबरच शेतकर्‍यांनीही आपआपली शेतीची कामे बाजूला ठेवून घरीच आराम केला. त्यामुळे काल शेतीची कामेही ठप्प झाल्याचे दिसून आले.

कर्फ्यूच्या काळात राहुरी नगर पालिका प्रशासन आणि देवळाली प्रवरा नगरपालिका प्रशासनाने शहरात धूर फवारणी करून स्वच्छता अभियान राबविले.
राहुरीतही काल अभूतपूर्व असा शुकशुकाट दिसून आला. शहरासह तालुक्याच्या गावागावांमध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीने ‘लॉकडाऊन’ झाल्याचे चित्र समोर आले.सकाळी सात वाजेपासून रस्ते बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. राहुरीचे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन चौफेर करडी नजर ठेवून असल्याचे दिसले. त्यास राहुरीकरांनीही उदंड प्रतिसाद दिला.

राहुरीच्या इतिहासात 2020 सालातील या दिवसांची नोंद ऐतिहासिक होईल, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. कोरोनाने देशभरात झपाट्याने वेग घेतला असताना महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेता कोरोनाची लागण होऊ नये यासाठी मानवी साखळी तोडणे अत्यंत गरजेचे होते. यासाठी जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा भाग पाहता जनता कर्फ्यू महत्त्वाचा होता. त्याकरीता शहरांसह ग्रामीण भागही लॉकडाऊन झाला. नागरिकांनीही स्वतः ला घराघरांमधे क्वारंटाईन करून घेतल्याने राहुरीत दिसलेले चित्र निश्चितच आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरले.

राहुरी शहराच्या नेहमी गजबजलेल्या शनिचौक, छत्रपती शिवाजी चौक, जुनीपेठ, शुक्लेश्वर चौक, आडवी पेठ, नवीपेठेसह स्टेशन रस्ता, कॉलेजरोड निर्मनुष्य झाला. शहरातून जाणारा राज्यमार्गही पहिल्यांदाच निर्मनुष्य दिसला.राहुरीकरांनीही शहरासह तालुका निगेटिव्ह राहण्यासाठी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

राहुरी तालुक्यातील राहुरी शहर, राहुरी खुर्द, देवळाली प्रवरा, बारागाव नांदूर, टाकळीमिया, मुसळवाडी, वांबोरी, ब्राम्हणी, उंबरे, वळण, मानोरी, आरडगाव, केंदळ, मुळानगर, राहुरी विद्यापीठ, डिग्रस, मांजरी, राहुरी फॅक्टरी, सोनगाव, सात्रळ, रामपूर, वरवंडी, कानडगाव, निंभेरे, तांभेरे, कोंढवड, शिलेगाव, आंबी, धानोरे, माहेगाव, मालुंजे खुर्द, खुडसरगाव, ताहाराबाद, म्हैसगाव, गणेगाव, कनगर, चिंचविहीरे, गुहा, राहुरी स्टेशन, तांदुळवाडी, खडांबे, देसवंडी, यासह सर्वच गावात कडकडीत कर्फ्यू पाळण्यात आला. तालुक्यातील सर्वच गावांमध्ये लॉकडाऊन झाले होते.

रून कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मदत करावी, विषाणूंचा बचाव करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन पेटकर यांनी केले आहे.

गेल्या 86 वषार्ंंच्या काळात असा बंद कधीही पाहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन नागरिकांनी कोरोना या महाआपत्तीविरूद्ध महालढा उभारला आहे. यात शासन आणि पोलीस खात्याने या जनता कर्फ्यूत बजावलेले राष्ट्रीय कर्तव्य नक्कीच अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. नागरिकांनीही घरीच थांबून दिलेला उत्स्फूर्त सहभाग प्रशंसनीय आहे. देश या आपत्तीतून लवकरच मुक्त होवो.

– सुुशीलाताई भुजाडी, राहुरी.

दरम्यान, घड्याळाचे काटे 5 वाजून 5 मिनिटांवर स्थिरावताच राहुरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंखध्वनी, टाळ्या, टाळ आणि थाळीनादाचा गजर केला. सुमारे 10 मिनिटे चाललेल्या या गजरामुळे वातावरणात जोश येऊन कोरोना या महाआपत्तीविरूद्धच्या लढाईचे रणशिंग फुंकले असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या. तर अनेकांनी घरातून घंटानाद करून प्रशासन, पोलीस, आरोग्य व यासह अन्य सेवेचे आभार मानले. यावेळी अनेकांनी मोदी-मोदींच्या नावाने गजर करून जोरदार घोषणाबाजी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या