Tuesday, April 23, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यातील कर्जमाफीच्या यादीत सावळा गोंधळ

राहुरी तालुक्यातील कर्जमाफीच्या यादीत सावळा गोंधळ

दोन लाखांच्या आतील राष्ट्रीयीकृत बँकेच्या खातेदारांना ठेंगा

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- राज्य शासनाने नुकतीच राहुरी तालुक्यातील 17 हजार 168 शेतकर्‍यांची कर्जमाफीची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये दोन लाखांपर्यंत कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा समावेश आहे. परंतु ज्या शेतकर्‍यांचे दोन लाखाच्या आत राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज आहे. परंतु त्यांची नावे या यादीत नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये सरकारबाबत तिव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत महाआघाडी सरकारने दोन लाखांच्या आत पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांची कर्जमाफीची घोषणा केली. त्याप्रमाणे 29 फेब्रुवारीला राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व नगर तालुक्यातील जखणगाव येथील शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली. त्यानंतर दोन मार्चला राहुरी तालुक्यातील 17 हजार 168 शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सहकारी सोसायटीमार्फत जिल्हा सहकारी बँकेकडून पीककर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांचा जास्त समावेश आहे.

मात्र, या यादीत राष्ट्रीयीकृत बँकेकडून पीककर्ज घेणार्‍या अत्यंत कमी म्हणजे बोटावर मोजण्याइतक्या शेतकर्‍यांची नावे आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकर्‍यांच्या नावावर दोन लाखांच्या आत कर्ज आहे, असे ते शेतकरी आहेत. कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये आपले नाव नाही, हे बघून हे शेतकरी धास्तावून गेले आहेत. आपले कर्ज दोन लाखाच्या आत असून देखील आपल्याला कर्जमाफीचा लाभ का मिळाला नाही? म्हणून राहुरीच्या स्टेट बँकेत रोज चकरा मारीत आहेत. तासन्तास थांबून देखील बँकेचे अधिकारी याबाबत कानावर हात ठेवत आहेत.

कर्जमाफीची शेतकर्‍यांची यादी ही आमच्या मुख्य कार्यालयाकडून जात असल्याने आम्हाला काहीच सांगता येणार नाही, असे सांगून शेतकर्‍यांची बोळवण केली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रसिद्ध झालेल्या यादीत नाव न आल्याने शेतकर्‍यांमध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शेतकरी आक्रमक झाले असून दुसरी यादी कधी प्रसिद्ध होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रसिद्ध झालेल्या यादी मध्ये अनेकांचे तीन ते चार खात्यावरील व वेगवेगळ्या बँका मधील खात्यावर कर्जमाफी मिळाली आहे. ही रक्कम चार ते पाच लाखाच्या पुढे आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांच्या नावावर पावणे दोन लाखाच्या आत राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज आहे, त्यांना यातून डावलले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणेच धन्याला धतूरा अन् . . . . अशी स्थिती झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

याबाबत राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे चौकशी करण्याचे सांगितले. सहाय्यक निबंधक नागरगोजे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, आणखी दोन हजार शेतकर्‍यांची यादी येणे बाकी आहे. ज्या शेतकर्‍यांची नावे यादीत आली आहेत, त्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू आहे. तीन दिवसांत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या