Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरीकरांनी घरातूनच केला खंडेरायाचा ‘येळकोट – येळकोट जयमल्हार’

राहुरीकरांनी घरातूनच केला खंडेरायाचा ‘येळकोट – येळकोट जयमल्हार’

खंडेरायांचा यात्रोत्सवाची 200 वर्षाची परंपरा खंडीत; यात्रोत्सव रद्द

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- देशासह जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने राहुरीच्या ग्रामदैवत खंडेराया यात्रेची जवळपास दोनशे वर्षांची परंपरा खंडीत झाल्याने राहुरी ग्रामस्थांसह सर्व भाविक भक्तांचा मोठा हिरमोड झाला. परंतु ग्रामस्थांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत घरातूनच खंडेरायाचे दर्शन घेत एक नवा आदर्श निर्माण केला. सर्वच भाविकांनी घरातूनच खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेत घरातच येळकोट-येळकोट जयमल्हार करीत खंडेरायाला साकडे घातले.

- Advertisement -

राहुरीतील खंडेरायाचा यात्रोत्सव हनुमान जयंतीनंतर येणार्‍या रविवारी दरवर्षी सुरू होत असतो. मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच युवक श्रीक्षेत्र पुणतांबा येथून पायी जाऊन कावडीने पाणी आणतात व याच पाण्याने खंडेरायाला जलाभिषेक करण्यात येतो. ग्रामस्थही मोठ्या आनंदात या कावड यात्रेकरूंचे शहरातील स्टेशन रस्त्यावर स्वागत करून ढोलताशा, बँड पथकासह कावड यात्रेकरूंना वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिरापर्यंत नेतात. खंडेरायाचा भंडारा अंगावर घेण्यात धन्यता मानताना राहुरीकर येणारे वर्ष खंडेरायाच्या कृपेने सुखी समृद्ध जाईल, अशी अपेक्षा करतात. यात्रा कमिटी तसेच खंडेराया देवस्थान ट्रस्ट यात्रा उत्सव उत्साहात साजरा होण्यासाठी जवळपास महिनाभरापासून कष्ट घेत असतात.

सायंकाळी भक्ताने माणसाने खचाखच भरलेल्या बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम तर सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. जिल्ह्यासह राज्यातून हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी भाविक राहुरीत येत असतात. परंतु कोरोनाच्या सावटामुळे बारा गाड्या ओढण्याचा उत्सवालाही फाटा देण्यात आला आहे. आपल्या देवस्थानची महती तसेच यात्रोत्सवाची कीर्ती राज्यासह देशात पोहोचविण्यासाठी व या उत्सवाला विस्तृत स्वरूप येण्यासाठी सर्वधर्मीय ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात यात सहभागी असतात.
यात्रेत टारगटांकडून गालबोट लागू नये, यात्रोत्सवात मुख्य आकर्षण असणारे रहाट पाळणे व इतर दुकानदारांना त्रास होऊ नये, म्हणून सर्व स्तरातील युवक रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास चार दिवस लक्ष ठेवून असतात. परंतु या कोरोनाच्या सावटाने सर्व प्रयत्नांना थांबा मिळाला आहे.

कुस्तीच्या आखाड्यातही नामवंत पैलवानांचा सहभाग असताना राज्याच्या या महान खेळाच्या परंपरेला प्रोत्साहन देण्याचाच प्रयत्न जोपासला जातो. मोठ्या प्रमाणात पैलवानांना बिदागी देऊन या खेळास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न होत असतो. त्याचबरोबर हजेरी, सोंग इत्यादी कार्यक्रम घेताना मोठी बिदागी देताना केवळ ग्रामीण लोककला जिवंत राहताना त्यास प्रोत्साहन मिळाले पाहिजे, हाच शुद्ध हेतू यातून जोपासला जातो. यावेळी मात्र, यात्रा उत्सवातील सर्वच कार्यक्रमांना कोरोनामुळे थांबा मिळाल्याने सर्वांचाच मोठा हिरमोड झाला आहे.

तरी सर्वांनीच घरी बसून खंडेरायाकडे देशासह जगाला लवकरात लवकर कोरोनापासून मुक्तीसाठी घरातूनच प्रार्थना करताना कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्ही सारे राहुरीकर एक असल्याचा आदर्श घालून दिल्याची भावना व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या