Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहुरी कारागृहातील चार आरोपींचा भिंतीला धडका घेण्याचा प्रयत्न

राहुरी कारागृहातील चार आरोपींचा भिंतीला धडका घेण्याचा प्रयत्न

जेवणात चटकदार पदार्थ न मिळाल्याने पोलिसांना अरेरावी

राहुरी (प्रतिनिधी)– राहुरीच्या कारागृहात कैद्यांना जेवण पुरविणार्‍या ठेकेदाराच्या इसमाने न्यायालयीन कोठडीतील चार आरोपींना जेवणाबरोबर मिरचीची भुकटी, फरसाण व वेफर्सचे पुडे देण्यास गार्ड अंमलदार व पहारेकरी यांनी मनाई केली. तुरूंगातील जेवणाला वैतागलेल्या काही आरोपींना हे चटकदार पदार्थ न मिळाल्याने चार आरोपींनी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मोठमोठ्याने आरडाओरड करून, कोठडीच्या गजाला धडका घेऊन आम्ही काहीही करू, अशी धमकी देऊन कोठडीत धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

कैद्यांना जेवण पुरविणार्‍या ठेकेदाराचा इसम सद्दाम शहा तीन व चार नंबरच्या कोठडीतील कैद्यांना जेवण देत होता. गार्ड अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ भाबड व पहारेकरी यांना त्याच्याकडे तिखट मिरचीच्या भुकटीची पुडी, फरसाण, वेफर्सचे पुडे आढळले. चार नंबर कोठडीत असलेल्या न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी मागणी केल्याचे शहा याने सांगितले. तिखट व बाहेरचे खाद्यपदार्थ दिल्यामुळे आरोपी आजारी पडतात. त्यामुळे, गार्ड अंमलदार यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे, चारही आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरड सुरू केली. तुम्ही पैसे घेतल्यावर देऊ देता काय? तुम्हाला पैसे पाहिजेत काय? असे ओरडू लागले. कोठडीच्या गजाला धडका घेऊ आम्ही काहीही करू, अशी धमकी आरोपींनी दिली.

दरम्यान, न्यायालयात नेलेल्या एका कैद्याला चार नंबरच्या कोठडीत ठेवताना, या चार आरोपींनी विरोध केला. पोलीस कोठडी मिळालेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवू नका, असे म्हणून त्या कैद्याला गचांडी धरून, बाहेर ढकलले. त्या कैद्याला तीन नंबरच्या कोठडीत ठेवावे लागले. याप्रकरणी घटनेचा अहवाल गार्ड अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल रामनाथ दादाबा भाबड यांनी राहुरी पोलीस निरीक्षक यांना दिला. त्याची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तालुका दंडाधिकारी व पोलीस उपअधीक्षक, श्रीरामपूर यांना पाठविली व तशी नोंद स्टेशन डायरीला केली आहे.

राहुरी कारागृहात चार कोठड्या आहेत. पैकी एक कोठडी महिला कैद्यांसाठी आहे. एका कोठडीत सहा कैदी ठेवण्याची क्षमता आहे. सध्या राहुरी कारागृहात 57 कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने, न्यायालयीन व पोलीस कोठडी मिळालेल्या कैद्यांना एकत्र ठेवावे लागते. परंतु, न्यायालयीन कोठडीतील आरोपींनी पोलीस कोठडीच्या कैद्याला गचांडून बाहेर काढल्याने, कैद्यांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कारागृहात जेवण पुरविणार्‍या ठेकेदाराची नियुक्ती ई-टेंडरद्वारे कारागृह महानिरीक्षक यांच्याकडून केली जाते. जेवण आळणी असल्यास काही कैदी तिखट मागतात. मिरची पूड सुटी होती की, बंद पॅकेट होते? मिरचीपूड पुरविणे योग्य की अयोग्य? याबाबत संबंधित ठेकेदाराला नोटीस काढून खुलासा मागविला जाईल.
– फसियोद्दीन शेख, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, राहुरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या