Wednesday, April 24, 2024
Homeनगरराहुरी तालुक्यात ‘होम क्वारंटाईन’ शिक्क्यावाल्यांची रस्त्यात मोकाट भ्रमंती

राहुरी तालुक्यात ‘होम क्वारंटाईन’ शिक्क्यावाल्यांची रस्त्यात मोकाट भ्रमंती

आरोग्य व प्रशासनाची डोकेदुखी वाढली

राहुरी (प्रतिनिधी)- कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राहुरी तालुक्यात शासन आणि प्रशासनाने लॉकडाऊन 100 टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेला 14 दिवस उलटून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात प्रशासन सतर्क असले तरी तालुक्यात सुमारे 5 हजार ‘होम क्वारंटाईन’ असा हातावर शिक्का मारलेल्यांपैकी काही नागरिक विनाकारण रस्तावर मोकाट फिरत असल्याने आरोग्य खात्याबरोबरच प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. राहुरी शहरात सुमारे 330 होम क्वारंटाईनचा शिक्का असलेले नागरिक असून त्यातील काही नागरिकही रस्त्यावर मोकाट फिरत असल्याची चर्चा होत आहे.

- Advertisement -

गेल्या 14 दिवसांपासून राहुरी तालुक्यात लॉकडाऊनचे नियम कठोरपणे पाळले जात आहेत. त्यावर प्रशासनाची करडी नजर आहे. गावोगावच्या तटबंदी सील करण्यात आल्या असून सर्वत्र कडेकोट सन्नाटा पसरला आहे. मात्र, काही होम क्वारंटाईन असलेले व बाहेरून आलेले नागरिक रस्त्यावर मोकाट फिरत असल्याची माहिती जागरूक नागरिकांनी दिली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, देवळाली प्रवरा बरोबरच राहुरीच्या सिमारेषाही बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ते आणि बाजारपेठा ओस पडल्या आहेत. शनिवारी देवळाली प्रवरा येथे भरणारा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आल्याने काल बाजारतळावर सन्नाटा पसरलेला होता. तर गुरूवारी राहुरीचा तर बुधवारी टाकळीमियाचा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता.

राहुरी महसूल यंत्रणेकडून तालुक्यातील गावोगावी तटबंदीचे आदेश देण्यात आल्याने अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात काही स्वयंघोषित रखवालदारांनी खासगी रस्ते बंद करून नागरिकांची अडवणूक सुरू केली आहे. तर देवळाली प्रवरा येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या रस्त्यावर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी नागरिकांची अडवणूक सुरू केली असून रूग्णांनाही दवाखान्यात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तर अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाही दमदाटी सुरू असून त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पाण्याच्या टाकीजवळील काही कर्मचारी मद्यपान करून अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी होत आहेत. दोन दिवसापूर्वी एका अत्यवस्थ असलेल्या प्रसुतीसाठी चाललेल्या महिलेची अडवणूक करून त्यांच्या कुटुंबाला अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती संबंधित कुटुंबाने दिली. तोंडाची टिकली वाजवून नागरिक व महिलांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या