Thursday, April 25, 2024
Homeनगरराहुरी फॅक्टरीला महामार्गावरील हॉटेलात खुलेआम दारूची विक्री

राहुरी फॅक्टरीला महामार्गावरील हॉटेलात खुलेआम दारूची विक्री

लॉकडाऊनच्या काळात दारूविक्री करण्यात हॉटेल मालकाला यश; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकीकडे सामान्य माणसाचे हाल होत असताना काही मंडळींनी मात्र, या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. राहुरी फॅक्टरी येथील बहुतांशी परमिट रूमधारकांनी आपापल्याकडील माल कमी-जास्त भावात आपल्या लाडक्या ग्राहकांना पुरविण्याचे सःशुल्क पुण्य पदरात पाडून घेतले. मात्र, दारू विकण्यात पटाईत असलेल्या एका हॉटेल मालकास देशीपासून सर्व प्रकारची दारू तिप्पट-चौपट भावाने विकण्यात चांगलेच चौफेर ‘यश’ मिळत आहे.

- Advertisement -

नगर-मनमाड महामार्गावर असलेल्या या हॉटेल मालकाची पोलीस खात्याशी चांगली सलगी आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावरील दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश झाले होते. त्या काळातच या हॉटेल मालकाने दररोज एक टेम्पो भरून देशी दारू विकण्याचा विक्रम केला आहे. या काळात त्याच्याकडून दारूशी संबंधित असलेल्या सर्वच खात्यांच्या अधिकारी, कर्मचारी यांना चांगली बिदागी मिळाली असल्याने सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात याच हॉटेल मालकाने देशी व इंग्लिश दारू तिप्पट, चौपट दराने विक्रीचा धडाका लावला आहे.

नगर-मनमाड महामार्गावर राजरोसपणे सुरू असलेल्या या ठेक्याची माहिती असूनही दारू उत्पादन शुल्क, पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण पैकी कुणीही या ठिकाणी कारवाई करीत नसल्याने या खात्याविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

दरम्यान, काल दारू उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारूचे दुकाने, परमीट रूम सील केले आहेत. या प्रकारामुळे या ठिकाणच्या दारूविक्रीस आळा बसेल, असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. कारण सर्व ठिकाणे अधिकृत बंद झाल्याने या गुत्त्यावर आता आणखी दाम वाढवून दारूविक्री सुरू राहणार आहे.

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्या आजाराशी सामना करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू करून लोकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आपल्या व्यसनाने त्रस्त झालेले अनेक तळीराम या दारू गुत्त्यावरून दारू घेण्यासाठी छुप्या मार्गाने बाहेर पडत आहेत. या बरोबरच परिसरात गावठी दारू बिस्लेरी पाण्याच्या बाटलीत टाकून त्याची पद्धतशीर विक्री सुरू असल्याची चर्चा आहे.

राहुरी तालुक्यातील प्रशासनाने अत्यंत कष्ट घेऊन आजपर्यंत तालुक्याला या आजारापासून दूर ठेवले आहे. नागरिकही त्यांना प्रतिसाद देत आहेत. लोकांनी घराबाहेर निघू नये म्हणून अनेक सेवाभावी संघटना लोकांना तयार अन्न, किराणा, भाजीपाला, फळे मोफत घरपोहोच देत आहेत. ते केवळ आपला तालुका, आपले शहर या आजारापासून दूर राहावेत.

मात्र, या अवैध दारूविक्री करणार्‍या गुत्त्यावर नगर-मनमाड महामार्गावरून जाणार्‍या अथवा लपून-छपून बाहेरगावावरून आलेल्या एखाद्या बाधित व्यक्तीमुळे या आजाराचा प्रसार झाला तर नवल वाटू नये.

राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरात सध्या दुचाकी वाहनावर दारूची विक्री होत आहे. ग्राहकांना जागेवरच दारूच्या बाटल्यांचा पुरवठा होत आहे. त्याकडे पोलिसांनी व संबंधित विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या