Thursday, April 25, 2024
Homeनगर…अखेर 3 वर्षांनंतर ती आली !

…अखेर 3 वर्षांनंतर ती आली !

राहाता – अखेर तीन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ती आली. कुणालाच पसंत नसली तरी दुसर्‍याची उसनी मागण्यापेक्षा ती हक्काची म्हणून सर्वांनी स्विकारली. ही कहाणी आहे राहाता तहसीलदारांच्या मोटार गाडीची. पूर्वीची गाडी सतत नादुरूस्त होत असल्या कारणाने तीन वर्षांपूर्वी ती गाडी तहसील कार्यालय इमारती समोर धक्क्याला लावून देण्यात आली.

काही दिवस तत्कालीन तहसीलदारांनी कधी स्वतःची, कधी ओळखीच्या लोकांची तर कधी कधी वाळूवाल्यांची गाडी वापरली. तिर्थक्षेत्र शिर्डीमुळे देशभरातून येणार्‍या व्हीआयपीच्या प्रोटोकॉल साठी 24 तास ऑनड्युटी असल्याने वाहनाची नेहमी गरज भासे. तत्कालिन तहसीलदारांनी विखे कारखान्याची खाजगी गाडी वर्षभर वापरली. त्यानंतर ती गाडी वापरायला अडचण येऊ लागल्याने त्याच कारखान्याची गाडी जिल्हाधीकारी कार्यालयाकडे वर्ग करून दोन वर्षे वापरली. वारंवार नविन वाहनाची मागणी सुरूच ठेवली अखेर त्या मागणीला जानेवारी 2020 मध्ये तीन वर्षांनंतर यश आले.

- Advertisement -

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात आलेल्या 14 नविन गाड्यांमध्ये राहाता तहसील कार्यालयाला नवी गाडी मिळाली. तहसील कार्यालयाचा कामाचा व्याप पहाता गाडी अगदीच तकलादू वाटते. यापूर्वी सुमो, स्कॉर्पीओ, बोलेरो अशा दणकट गाड्या या विभागास दिल्या जात.

आता मात्र नाजूक कार दिल्याने नव्या गाडीचा आनंद गाडी दारात येताच मावळला. राहाता तहसीलदारांच्या गाडीला 24 तास काम असते. गोदावरी व प्रवरा दोन नद्यांची वाळू तस्करी रोखण्यापेक्षा साईदर्शनासाठी येणारेे मंत्रीगण, लोकप्रतिनीधी व शासकीय अधिकारी, यांच्या प्रोटोकॉलसाठी जास्त वेळ खर्ची होतो. तसेच राष्ट्रपती व पंतप्रधान आदी महत्त्वाच्या व्यक्ती शिर्डीत येतात त्यांच्या वाहनांच्या प्रोटोकॉलात ही गाडी कशी जाईल हा एक चिंतेचा विषय सर्वांसाठी बनला आहे.

साई संस्थानने दिलेल्या गाडीने 15 वर्षे सेवा दिली
शिर्डी दंगलीवेळी राहाता तहसीलदार व प्रांत यांच्या गाड्यांचे नुकसान झाले होते. त्या बदल्यात संस्थानने प्रांतांना स्कॉर्पीओ व तहसीलदारांना सुमो गाडी दिली होती. 15 वर्षे त्या गाडीने सेवा दिली आता सरकारची ही गाडी किती वर्षे सेवा देते हे काळच ठरवील.

- Advertisment -

ताज्या बातम्या