Friday, April 26, 2024
Homeनगरराहाता पालिका कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांचे पगार थकले

राहाता पालिका कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांचे पगार थकले

25 महिलांसह 43 कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

राहाता (तालुका प्रतिनिधी) – राहाता पालिकेच्या रोजंदारीवरील 43 कर्मचार्‍यांना पाच महिन्यांपासून पगारच नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दोन दिवसात पगार न दिल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा या महिलांनी राहाता पालिका प्रशासनाला दिला आहे.

- Advertisement -

पालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील लढाईमुळे पालिकेच्या 43 कंत्राटी कर्मचार्‍यांचा चालू तीन महिन्यांचा व मागील दोन महिन्यांचा असा पाच महिन्यांचा पगार पालिकेकडे थकल्याने 25 महिला कर्मचारी व 18 पुरूष कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. घरात दाणा नाही, मुलाबाळांना कसे सांभाळायचे या चिंतेत उपाशीपोटी महिला शहराची स्वच्छता करत आहे.

अनेक महिन्याची दुकानदारांची उधारी थकल्याने या कर्मचार्‍यांना कुणी उधारही देत नाही. ठेकेदार भेटत नाही नगराध्यक्षा व नगरसेवक दखल घेत नसल्याने दाद मागावी कुणाकडे? आतापर्यंत अनेकवेळा निवेदन देऊनही प्रशासन केवळ आश्वासनाशिवाय काही देत नाही. आम्हाला आमचे पगार द्या मुला बाळांवर उपासमार आली, अशी आर्त हाक या महिला मारत आहे.

पालिकेचा स्वच्छतेचा ठेका दिलेल्या कंपनीने करार केल्या प्रमाणे काम न केल्याने अनियमीतता व जादा पैसे पालिकेकडून उचलले म्हणून मागील प्रभारी मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांनी सदर ठेका रद्द करून न केलेल्या कामाचे उचललेले लाखो रूपयेे संबंधित कंपनीकडून वसूल करावे, असा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे दिल्याने संबंधित कर्मचार्‍यांचे पगार मात्र कंपनीने केले नाहीत.

मात्र याच कर्मचार्‍यांकडून पालिका काम करून घेते मात्र पगार देत नाही. पालिका पदाधिकार्‍यांच्या कुरघोडीच्या राजकारणात या गरीब कर्मचार्‍यांची परवड होत आहे.

विखे-पिपाडा गट एकत्र येऊनही कामगारांसह जनतेची परवड
गेल्या दोन वर्षांपासून पिपाड गट व विखे गटाच्या नगरसेवकांत तू तू मै मै सुरू होती. मात्र गेल्या महिन्यात पिपाडांच्या पुढाकाराने विखे गटाच्या नगरसेवकांचे मनोमीलन होऊन ज्या कामांना व कारभाराला सतत विरोध करणार्‍या नगरसेवकांनी माघार घेत दिलेल्या अर्जावर घूमजाव करत सत्ताधारी गटाला साथ देण्याचा निर्णय घेत त्यांच्याबरोबर गेले. मात्र त्या नगरसेवकांना शहराची झालेली दुर्दशा व कामगारांवर आलेल्या उपासमारीचा विसर पडला. तसेच नेमका कुणाचा विकास करण्यासाठी हे सर्व एक झाले याची चर्चा शहरात चर्चिली जात आहे. ज्या महिला अधिकार्‍यांकडे याच नगरसेवकांनी तक्रारी केल्या, जिल्हाधिकारी व प्रधान सचिवापर्यंत अर्ज केले त्याच प्रकरणी आता यांनी घूमजाव करत तो मी नव्हेच असा पवित्रा घेतल्याने या नगरसेवकांची मोठी चर्चा सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या