Thursday, April 25, 2024
Homeनगररब्बी पिकांना लागली मुळाच्या आवर्तनाची तहान

रब्बी पिकांना लागली मुळाच्या आवर्तनाची तहान

उजव्या कालव्याला आवर्तनाची मागणी; कालवा सल्लागार समितीची अद्याप बैठक नाही

उंबरे (वार्ताहर) – मुळा धरणातून उजव्या कालव्याला आवर्तन सुटून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. आता तब्बल 60 दिवसांनंतर रब्बी हंगामातील पिके पाण्यावर आली असून मुळा धरणातून उजव्या कालव्याला तातडीने पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुळा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच आवर्तन सोडण्यात येणार असून सध्या लाभधारक शेतकर्‍यांकडून पाण्याची मागणी होत नसल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा 1 फेब्रुवारी रोजी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे संकेत पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. तर मुळा कालवा सल्लागार समितीच्या पदाधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेऊन उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यात खरिपाची पिके हातची गेली. त्यामुळे रब्बीचा हंगाम राहुरी तालुक्यात उशिरा सुरू झाला. मुळा धरण ऑगस्ट महिन्यात दोन वेळा पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लोचे पाणी नदीपात्रातून सोडण्यात आले.

त्यामुळे उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शेतकर्‍यांना पाण्याची चणचण भासली नाही. त्यावर रब्बी हंगामातील पिकांनी चांगले बाळसे धरले. आता दोन महिने उलटून गेल्यानंतर रब्बी हंगामातील पिके तहानलेली असून आवर्तनाची गरज भासू लागली आहे. गहू आणि हरभरा ही पिके पोटर्‍यात आली आहेत. तर ज्वारीचे पीक उभारीला आले असून कणसात दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आवर्तनाची गरज भासू लागली आहे.

यंदा थंडी उशिरा सुरू झाल्याने रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट होण्याच्या मार्गावर असताना आता पाण्याविना रब्बी हातचा जाणार की काय? अशी शंका शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. दोन महिन्यापूर्वी मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या विहिरी व कुपनलिकांची पाण्याची पातळी समाधानकारक राहिली.

आता पाण्याची पातळी घटू लागली आहे. तेव्हा तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी तनपुरे साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नामदेवराव ढोकणे, माजी संचालक सुनील अडसुरे, वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, साहेबराव म्हसे, अनिल आढाव, अनिल दौंड, जगन्नाथ चौधरी, बारकू कदम, माणिक तारडे, नामदेवराव म्हसे आदींसह अन्य शेतकर्‍यांनी केली आहे.

एकीकडे रब्बी पिकांना आवर्तनाची गरज असताना मात्र, पाणी वापर संस्थांनी पाटबंधारे खात्याकडे आवर्तनाच्या मागणीवर मौन बाळगले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणाचा अड्डा बनलेल्या या संस्था शेतकर्‍यांच्या पाणी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या संस्था बरखास्त करण्याची मागणीही शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, पाटबंधारे खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही पाणी वापर संस्थेकडून आवर्तनाची मागणी आली नसल्याचे सांगितल्याने शेतकर्‍यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या