Wednesday, April 24, 2024
Homeनगरपुणतांब्यातील कुटुंबाचा वाळूतस्कराविरोधात एल्गार

पुणतांब्यातील कुटुंबाचा वाळूतस्कराविरोधात एल्गार

तेरा जणांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पुरणगाव रोडलगत गोदावरी नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणारी वाहने शेतातून जाऊ देण्यास विरोध केला, म्हणून येथील वाळूतस्करांनी संपूर्ण कुटुंबांलाच जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या कुटुंबातील 13 व्यक्तींनी एका लेखी निवेदनाद्वारे दि. 26 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 11 वाजता पुणतांबा येथील तलाठी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

- Advertisement -

याबाबत राहाता पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या गोदावरी नदीला पाणी कमी झाल्यामुळे नदीच्या काठावर पुरणगावच्या समोर पुणतांबा हद्दीत वाळू उघडी पडली आहे. अंदाजे 25 फूट उंचीचा वाळूचा थर दिसू लागल्यामुळे येथील वाळूतस्करांनी बेकायदा वाळूचा उपसा सुरू केला आहे. शेतातून वाळूचा ट्रॅक्टर अडविला असता ट्रॅक्टरचालकाने वाळू वाहतूक करणार्‍या तस्करांना बोलावले त्यांनी सौ. सुनिता शेरकर व त्यांच्या पतीला मारहाण केली.

तसेच घरी येऊन कुटुंंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संपुर्ण कुटुंब दहशतीखाली आहे. त्यांची पुणतांबा परिसरात दहशत असल्याने कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे या वाळूतस्करांवर कारवाई करावी, अन्यथा सामुहिक आत्मदहनाशिवाय पर्याय नसल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

निवेदनावर सौ. सुनिता शिवाजी शेरकर, शिवाजी शेरकर, लक्ष्मण शेरकर, वेणूबाई लक्ष्मण शेरकर, संजय शेरकर, मंगल संजय शेरकर, दिनेश शेरकर, रत्ना शेरकर, मयुर शेरकर, सुरज शेरकर, सुमित शेरकर, कैलास शेरकर, शोभा कैलास शेरकर यांच्या सह्या आहेत.

दरम्यान, चालू वर्षी गोदावरी नदीला तीन वेळा पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाळू वाहून आली आहे. पाणी कमी झाल्यामुळे वाळूतस्करांनी आतापासूनच उपसा सुरू केला आहे. विशेष म्हणजे वाळूच्या उपशात काही राजकीय लोकांचे हितसंबंध असल्यामुळे वाळूतस्करांना चांगलीच मोकळीक मिळाली आहे. तेरा जणांनी सामूहिक आत्मदहनाचे लेखी निवेदन दिल्यामुळे प्रशासन नेमके काय करते ? याकडे परिसराचे लक्ष लागून आहे.

नेत्याच्या अंगरक्षकास वाळूतस्करांकडून चोप

हप्ता मागणे पडले महागात; अंगरक्षकाची हकालपट्टी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील खैरी निमगाव मध्ये वाळूतस्करांकडून तालुक्यातील एका नेत्याच्या अंगरक्षकास चांगलाच चोप देण्यात आला. काल रात्री अकरा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत विचारणा करण्यासाठी सदर नेत्याकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी त्या अंगरक्षकाची तडकाफडकी हकालपट्टी केल्याचे समजते.

सध्या गोदावरी नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे थडीच्या कडेची वाळू उघडी पडलेली आहे. अनेक दिवसांपासून गोदावरी नदीला पाणी असल्याने वाळूतस्करी बंद होती. परंतु आता वाळूतस्करांनी पुन्हा मोठ्या प्रमाणावर अवैधपणे वाळूउपसा सुरू केला आहे. वाळूउपसा करण्यासाठी वाळूतस्करांनी मध्ये चढाओढ सुरू झाली आहे.

गोदावरी नदीपात्रातून वाळू वाहतूक करण्यासाठी नाऊर-खैरी रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे खैरी निमगाव परिसरात नेहमी वाळू तस्करांकडून अशा घटना घडत असतात.

काल मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर मतदारसंघातील एका नेत्याच्या अंगरक्षकाने वाळू तस्करांकडे हप्त्यांची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या वाळूतस्करांनी त्याला चांगलाच चोप दिला. खैरी निमगाव येथे घडलेल्या या घटनेबाबत काल श्रीरामपूर शहर व तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

मागील काही दिवसापुर्वी याच ठिकाणी वाळूतस्करांच्या दोन गटांमध्ये चांगलेच वाद होवून हाणामार्‍या झाल्या होत्या. कालची मारहाणीची घटना घडल्यानंतर या नेत्याला अनेक कार्यकर्त्यांचे फोन गेले. तसेच पत्रकारांनीही विचारणा केली. त्यानंतर या नेत्याने याची तातडीने दखल घेत उद्यापासून तू माझ्याकडे येवून नको असे या अंगरक्षकास कळविले असल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या