Sunday, April 28, 2024
Homeनगरकर्जत, श्रीगोंद्यात कुकडीचे पाणी पेटले

कर्जत, श्रीगोंद्यात कुकडीचे पाणी पेटले

कर्जत/श्रीगोंदा (प्रतिनीधी)- कर्जत आणि श्रीगोंद्याच्या कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आता पेटला असून, माजी मंत्री राम शिंदे यांनी कर्जतमध्ये तर माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्यात उपोषण करून सत्ताधार्‍यांना जाब विचारला आहे. शिंदे यांनी तर आ. रोहित पवार यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत कुकडीचे पाणी 6 जूनला सोडण्यात येणार असल्याचे आ. रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते.

त्यामुळे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री राम शिंदे उपोषण करणार की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले. ते मात्र उपोषणावर ठाम होते, त्यानुसार ते कर्जतला तहसील कार्यालयासमोर सोमवारी उपोषणास बसले. कुकडीच्या पाण्यावरून आ. पवार यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. शिंदे यांच्यासमवेत यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, अशोक खेडकर, प्रसाद ढोकरीकर, स्वप्नील देसाई, युवराज शेळके, काकासाहेब धांडे, सुनील यादव, सचिन पोटरे, शांतीलाल कोपनर, अनिल गदादे, अमृत काळदाते, अल्लाउदीन काझी, उमेश जेवरे, संपत बावडकर, वैभव शहा, राहूल निंबोरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

शिंदे म्हणाले, आमच्या उपोषणाला घाबरून कुकडीचे आवर्तन सोडण्याची घोषणा आ. पवार यांनी केली. मात्र 6 जून रोजी कुकडीचे पाणी सुटणार नाही. येडगाव धरणातून कुकडीचे पाणी सोडले जाते. त्यामध्ये आज पाणीच शिल्लक नाही. मग आमदार शेतकर्‍यांना पाणी कोठून देणार होते? त्यांनी शेतकर्‍यांना फसवले आणि आज कुकडीच्या अधिकार्‍यांनीही हे मान्य केले. येडगाव धरणात 6 जुनला पिंपळगाव जोेगे, माणिकडोह, डिंबे या धरणामधून चार टिएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. नंतर येडगावमध्ये पुरेसे पाणी साठल्यावर पाणी सोडणार. म्हणजे आवर्तन कधी सुरू होणार आणि शेतकर्‍यांना पाणी कधी मिळणार? तो पर्यत शेतकरी आणि शेती शिल्ल्क राहील काय? आ. पवार सतत फेसबूकवरून जनतेशी संवाद साधत असतात. आता कुकडीच्या पाण्यावर देखील शेतकर्‍यांशी संवाद साधावा, असे आव्हानही त्यांनी केले.
यावेळी कुकडीचे कार्यकारी आभियंता रामदास जगताप यांनी लेखी पत्र दिले. कुकडीचे पाणी 10 जून रोजी सुटेल आणि 15 जून रोजी कर्जत तालुक्यात पोहचेल, असे या पत्रात म्हटले आहे. पत्र मिळाल्यानंतर शिंदे यांनी उपोषण मागे घेतले. दुसरीकडे कुकडीच्या धरणातील पाण्याचे व पाट पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याचा आरोप करत माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंद्यात उपोषण झाले. यामध्ये प्रा. तुकाराम दरेकर, संदीप नागवडे, गणपतराव काकडे आणि अनुजा गायकवाड सहभागी झाले.

कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व तहसिलदार महेंद्र महाजन यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. कुकडी धरणातील पाण्याच्या नियोजनावर आणि पाट पाण्याच्या नियोजनावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर कुकडीच्या कालव्यातून अनधिकृतपणे उचलले जाणारे 300 दशलक्ष घनफूट पाणी श्रीगोंद्याच्या पूर्व भागातील सिंचनावर परिणाम करत असल्याचे सर्वांनीच मान्य केले. या अनधिकृत पाण्याचा बंदोबस्त केल्यास 650 क्यूसेक्स पाणी कर्जतला देऊन 300 क्युसेक्स पाणी वितरिका क्रमांक 10, 11, 12, 13 व 14 या वितरिकांना देणे शक्य आहे.

तसेच हेच पाणी पारगाव तलाव, लेंडी नाला, औटेवाडी तलाव व घोडेगाव तलावाला देता येऊ शकते. मागच्या आवर्तनात वंचित राहिलेल्या घोडेगाव तलावाला वाचविलेल्या 300 क्युसेक्स पाण्यामधून प्रथम प्राधान्याने पाणी देण्याचे आश्वासन काळे यांनी दिले. 6 जून पूर्वी अनधिकृत पाईपलाईन, अनधिकृत होस पाईप आणि अनधिकृत शेततळी यांचा बंदोबस्त करून आवर्तन न्याय्य पद्धतीने करण्याचे त्यांनी मान्य केले. चर्चेमध्ये ठरलेल्या सर्व बाबी लिखित स्वरूपात उपोषणकर्त्यांना देण्याचेही श्री. काळे यांनी मान्य केले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

फाळकेंना आमदार करा : शिंदे
कर्जत येथे राम शिंदे म्हणाले, येथील जनतेचे प्रश्न समजण्यासाठी आणि सोडविण्यासाठी स्थानिक आमदार असण्याची गरज आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यातील राजेंद्र फाळके किंवा अन्य कोणासही उमेदवारी देवून राष्ट्रवादीने आमदार केल्यास येथील प्रश्न सुटण्यास मदत होतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या