Friday, April 26, 2024
Homeनगरनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी) – नागरीकत्व कायदा दुरुस्तीला विरोध करत संगमनेरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई गट, एमआयएम, पुरोगामी संघटना, सामाजिक संघटना यांच्यासह मित्र पक्षांच्यावतीने काल शुक्रवारी संयुक्त संविधान बचाव रॅली काढत सीएए व एनआरसी विरोधात आंदोलन केले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नागरीकत्व कायदा दुरुस्तीस विरोध आणि देशात वाढलेली एकाधिकारशाही या विरुध्द देशात होे असलेल्या सर्व पक्षीय सहभाग म्हणून संगमनेरात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई गट, एमआयएम, पुरोगामी संघटना, सामाजिक संघटना व मित्रपक्षांच्या वतीने संयुक्त संविधान बचावाकरीता शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलपासून रॅली काढण्यात आली. घोषणा देत सर्व सहभागी कार्यकर्त्यांनी गवंडीपुरा ते महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नवीन नगररोड, प्रांत कार्यालय अशी रॅली काढली.

राहाता (तालुका प्रतिनिधी) – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राहाता येथे मुस्लिम बांधवांनी विरोध दर्शविण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. केंद्राने केलेल्या नागरिकत्व सुधारणाबाबत सीएए आणि प्रस्तावित असलेल्या एनआरसी बाबत विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी राहाता येथील वीरभद्र मंदिरापासून मुस्लिम बांधवांनी मोर्चा नेऊन आपला विरोध दर्शविला. या मोर्चामध्ये आंबेडकरवादी समाजही सहभागी होता. तहसील कार्यात झालेल्या सभेमध्ये अनेकांनी आपल्या भाषणातून नागरिकत्व कायद्याबाबत व तो कायदा रद्द करण्याबाबत आपले विचार व्यक्त केले. यामध्ये मौलाना अब्दुल रौफ, काँग्रेसचे सुरेश थोरात, राष्ट्रवादीचे रंजित बोठे, आरपीपीचे प्रदीप बनसोडे, सिमोन जगताप आदींची भाषणे झाली. तहसीलदार कुंदन हिरे यांना यावेळी निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये मौलाना याहिया शेख अब्दुल, मौलाना रफिक मौलाना इब्राहिम, मौलाना युसूफ, नगरसेवक सलीम शहा, मुन्ना फिटर, प्रदीप बनसोडे, शहा मुस्ताक अली, इलियास शहा आदींसह तालुक्यातील मुस्लिम तसेच दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

कोपरगाव (प्रतिनिधी) – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात कोपरगावात मुस्लिम बांधवांनी विरोध दर्शवण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात मुस्लिम बांधवांबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
केंद्राने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत सीएए आणि एनआरसीबाबत विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून मुस्लिम बांधवांनी मोर्चा नेऊन आपला विरोध दर्शविला. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. मोठा जनसमूह मोर्चात सहभागी झाला होता. तहसील कार्यालयाजवळ मोर्चाचेे सभेत रूपांतर झाले. मोर्चात मुस्लिम समाजासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी सहभागी झाले होते तर अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यानी सहभाग घेत सरकारचा निषेध केला. यावेळी जमियात उलमाए हिंद आणि मुस्लिम समाज आणि इतर संघटनांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

जामखेड (तालुका प्रतिनिधी) – केंद्र सरकारने संविधानातील मूलभूत हक्क असलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करीत नागरिकत्व संशोधन कायदा व एनआरसी प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी जामखेड येथील जमीअत उलमा ए हिंद व मुस्लीम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या